पुणे: हजारो हिंदू भाविकांचे गेल्या ६० वर्षांहून अधिक काळ श्रद्धास्थान असलेल्या विश्रांतवाडी चौकातील श्री शिव, गणपती व दुर्गा यांचे मंदिर हटविण्याची नोटीस पुणे महानगरपालिकेने दिली आहे. मंदिर हटविण्यासाठी होऊ घातलेल्या या कारवाईविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने गुरुवारी महाआरती व जनआंदोलन करण्यात आले.
हे मंदिर या परिसरातील संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेचे केंद्र आहे. परंतु पुणे महानगरपालिकेने अचानकपणे, कोणतीही पूर्वसूचना न देता, केवळ २४ तासांच्या आत हे मंदिर हटविण्याची नोटीस पाठवली आहे. ही कारवाई हिंदू समाजाच्या श्रद्धेचा, भावनांचा आणि धार्मिक अधिकारांचा स्पष्ट अपमान आहे. मंदिर खासगी मालमत्तेवर असून, जागेच्या मालकासदेखील पूर्वकल्पना न देता महापालिकेने ही अन्यायकारक व बेकायदेशीर नोटीस दिली आहे.
याविरोधात श्री पंचदशनाम आवाहन आखाडा (उज्जैन) उत्तराधिकारी योगीजी ऋषभनाथ गिरी महाराज, धर्मरक्षक पैलवान नितीन आमुने व ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ विचारवंत मिलिंद एकबोटे यांच्या नेतृत्वात सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी विश्रांतवाडी चौकात महाआरती करत आंदोलन केले. पुणे महापालिकेने तातडीने ही नोटीस रद्द करावी. मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक हिंदू समाजासोबत चर्चा करून याला पर्याय शोधावा आणि रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली केवळ मंदिरच नव्हे, तर इतर धार्मिक स्थळांवरही सारखेच निकष लागू करावेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.