नवी दिल्ली, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानची किमान ५ लढाऊ विमाने आणि १ टेहळणी विमान पाडले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी होण्यामागे राजकीय इच्छाशक्तीचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन हवाईदल प्रमुख एअरचीफमार्शल अमर प्रीत सिंग यांनी शनिवारी हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेडच्या (एचएएल) मॅनेजमेंट अकॅडमीत बोलताना केले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचे एक प्रमुख कारण म्हणजे राजकीय इच्छाशक्तीची. राजकीय इच्छाशक्ती अतिशय स्पष्ट असल्याने आम्हाला अतिशय सुस्पष्ट निर्देश देण्यात आले होते. सैन्यदलांवर कोणत्याही प्रकारची बंधने नव्हती. काही बंधने असलेच तर ती सैन्यदलांची स्वतःची होती, युद्धाचे नियमही आम्हीच ठरवले होते. योजना आखण्याचे आणि अंमलबजावणीचे पूर्ण स्वातंत्र्य असल्याने वाढत्या तणावावर नियंत्रण कसे ठेवायचे, याचाही निर्णय सैन्यदलांनी घेतला. ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी होण्यामध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाईदलाचा परस्पर समन्वय महत्त्वाचा होता, त्यामध्ये भारताच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची (सीडीएस) भूमिका महत्त्वाची ठरली, त्याचप्रमाणे सर्व सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनीही (एनएसए) कळीची भूमिका बजावली, असे एअरचीफमार्शल अमर प्रीत सिंग म्हणाले.
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’पाकच्या सैन्यदलांचा कणा मोडल्याचा पुनरुच्चार हवाईदलप्रमुखांनी केला. ते पुढे म्हणाले, भारताने पाकच्या पाच लढाऊ लढाऊ विमानांना पाडले आहे. त्याचप्रमाणे इलआयएनटी अथवा ‘एईब्ल्यू अँड सी’ प्रकारचे टेहळणी विमान असू शकते. विशेष म्हणजे हे विमान भारतीय संरक्षण प्रणालीने सुमारे ३०० किमी अंतरावरून पाडण्यात आले आहे. अशाप्रकारे जमिनीवरून हवेत विमान पाडण्याची आतापर्यंतची ही सर्वात मोठी नोंद झाली आहे.
‘एफ-१६’ देखील भारताच्या लक्ष्यावर
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताची ‘एस ४००’ ही हवाई संरक्षण प्रणाली अतिशय महत्त्वाची ठरल्याचे हवाईदलप्रमुखांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारताच्या हल्ल्यात शहबाज जेकबाबाद हवाईतळावर ‘एफ-१६’ ही अमेरिकी लढाऊ विमानांच्य़ा हँगरचा काही भाग उद्ध्वस्त झाला असून तेथे असलेली काही विमानेही नुकसानग्रस्त झाली आहेत. त्याचप्रमाणे या कारवाईत मुरिद आणि चकला येथील किमान दोन कमांड अँड कंट्रोल सेंटर्स तसेच सहा रडार प्रणाली (मोठ्या व लहान) नष्ट करण्यात आल्या आहेत. ‘एईब्ल्यू अँड सी’हॅंगरमध्ये एक ‘एईब्ल्यू अँड सी’ विमान आणि देखभालीस असलेली काही ‘एफ-१६’ विमानांचेही नुकसान झाल्याचेही हवाईदलप्रमुखांनी सांगितले आहे.