कल्पनारम्य अभिनय

09 Aug 2025 22:32:19

साहित्य आणि कलाकृतीमध्ये कल्पनेला फारच महत्त्व आहे. आपल्याकडे म्हणही आहे. ‘जो न देखे रवि वो देखे कवि’. जगाला प्रकाश देणार्या सूर्याला तेच दिसते जे प्रत्यक्षात आहे. मात्र, कल्पनेचे बघण्याचे सामर्थ्य त्याच्यात नाही. हे सामर्थ्य म्हणजे नाटककार, साहित्यिक यांना लाभलेले दैवी वरदानच! एका वेगळ्याच दुनियेचा परिचय त्यांच्या कल्पनेतून रसिकांना होतो. लहान मुलांच्या अभिनय अंगाच्या विकासात कल्पनारम्य अभिनयाचा वाटा फार मोठा आहे. त्यातून मुलेही अनेक गुण आत्मसात करतात. कल्पनारम्य अभिनयाच्या माध्यमातून मुलांचा नेमका कसा विकास होतो, याचा घेतलेला हा मागोवा...


ल्पनारम्य अभिनय - इंग्रजीत त्याला Improvisation म्हणतात. कल्पनारम्य अभिनय हा कल्पकता व सर्जनशील विचार यातून निर्माण होतो. तो एखाद्या कल्पनेच्या ठिणगीने सुरू होतो. ही ठिणगी जेव्हा एकाग्रतेने आणि खोलवर शोधली जाते, तेव्हा ती सर्जनशीलतेचे रूप घेते. ही प्रक्रिया विचारांच्या पातळीवर सुरू होते; पण तिचे मूर्तरूप साहित्य, चित्रकला, संगीत, नृत्य आणि विशेषतः नाट्यकलेतून प्रकट होते, जिथे विविध कलाप्रकार एकत्रितपणे काम करतात.

बालनाट्याच्या संदर्भात, कल्पनारम्य अभिनय हे एक प्रभावी साधन आहे. मुलांना एखादे काम किंवा विषय दिला जातो आणि त्या अनुषंगाने ते प्रसंग रंगवतात. कधी त्यांना एका शब्दावरून संपूर्ण कथानक उभे करायला सांगितले जाते, तर कधी संवादाशिवाय, म्हणजेच मूकाभिनयाद्वारेही एखादे दृश्य सादर करायला सांगितले जाते. या साध्या आणि मजेशीर नाट्यखेळांमधून मुले कल्पनाशक्ती, एकाग्रता, मानसिक, भावनिक आणि शारीरिक समतोल तसेच, सामाजिक कौशल्य आत्मसात करत आहेत. त्यांना हे शिकताना, ते शिकत आहेत हेसुद्धा जाणवत नाही. कारण, ते त्या मजेत सहभागी होतात.

कल्पनारम्य अभिनयाने विचारशक्ती वाढते. हा अभिनय स्मरणशक्ती, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास याचा विकास करतो. यातून मुलं नेतृत्व करायला शिकतात आणि त्याचवेळी इतरांचेही म्हणणं ऐकून घेतात. गटात सामावून घेताना त्यांची वैयक्तिक ओळखही उभारली जाते. ही प्रक्रिया त्यांना प्रश्न विचारायला शिकवते, विचार करायला प्रवृत्त करते, फक्त स्वतःसाठीच नव्हे, तर त्यांच्या भूमिकेतील पात्रांसाठी आणि सहअभिनेत्यांसाठीसुद्धा. शेवटी, ही एक अशी पद्धत ठरते जी विचार करणारी, सर्जनशील आणि सहकार्यशील मुले घडवते, अशी मुलं जी उत्तरदायी आणि विश्वासू ही असतात.

नाट्यप्रशिक्षणाच्या दरम्यान, अनेक प्रकारच्या कल्पनारम्य अभिनयाच्या पद्धती वापरल्या जातात. त्यातील काही पारंपरिक आहेत, तर काही मी स्वतः विकसित केलेल्या बालनाट्याच्या गरजेनुसार खास रचलेल्या आहेत. त्यांचं विवरण खाली दिलं आहे.
माझ्याकडून बालनाट्यासाठी खास तयार केलेले अभिनय प्रकार:

रॅडीसह प्रवास

मुलांना शहराच्या गर्दीपासून दूर असलेल्या निसर्गरम्य ठिकाणी उदा. एखाद्या फार्महाऊसवर नेलं जातं. तिथे मातीचा वापर करून खेळभांडी, तंबू उभारणं, निसर्गभ्रमंती अशा क्रिया घेतल्या जातात. या अनुभवाच्या आधारे, मुले कथा तयार करतात आणि ती सादरही करतात. त्यातून मुलांच्या जीवनकौशल्यांचा विकास होतो, जसे की सर्जनशील विचार, संघभावना.

सोशल मीडियावर प्रचार :

मुलांना सांगितले जाते की, त्यांनी त्यांच्या नाटकाचा प्रचार समाजमाध्यमांवर करायचा आहे. हा प्रचार अशा पद्धतीने करायचा आहे की, प्रेक्षक नाटक पाहण्यासाठी आणि त्याचे तिकीट विकत घेण्यास प्रोत्साहित होतील. याने संवादकौशल्य, सर्जनशील विचार या गुणांचा विकास होतो.

पालकासोबत आरसा खेळ :


प्रत्येक विद्यार्थी आपल्या एका पालकासोबत समोरासमोर उभा राहतो, जणू काही ते एकमेकांचे प्रतिबिंब आहेत. एकजण काहीही करतो, बोलतो त्यावेळी दुसर्याने त्याचे हुबेहूब अनुकरण करायचे. पालक अशा वायाचा वापर करतात, जे मुलं घरी वारंवार बोलतात आणि मुलंही त्यांच्या पालकांची वाय बोलतात. नाते वृद्धिंगत करणे, संवेदनशीलता, एकमेकांविषयीची समज अशा जीवनकौशल्यांचा विकास होतो.

प्रॉसी :


जर एखादा विद्यार्थी सरावावेळी अनुपस्थित असेल, तर दुसर्या विद्यार्थ्याला त्या भूमिकेत काम करायला सांगितलं जातं. संवाद माहीत नसले, तरी पटकथा आणि कथा माहिती असल्यामुळे तो/ती योग्य शब्द योजून प्रसंग पुढे न्यायला शिकतो/शिकते. आत्मविश्वास, प्रेरणा, जबाबदारी, सहकार्य, संवेदनशीलता या गुणांचा त्यातून विकास होतो.

रॅडी बना - मार्गदर्शकाची भूमिका :

विद्यार्थ्यांना एक स्किट दिलं जाते आणि त्यात त्यांनी त्यांच्या मार्गदर्शक असलेल्या रॅडीची भूमिका (रॅडी म्हणजे मी) साकारायची असते. मुले तिच्या चालण्याच्या, बोलण्याच्या, शिकवण्याच्या शैलीचं अनुकरण करतात. यातून त्यांचा जीवनकौशल्य विकास होतो जसे की, संवेदनशीलता, निरीक्षण, नेतृत्व, कल्पनाशक्तीला ताण देऊन काम करणं मुलांना खूप आवडतं. दिलेलं स्वातंत्र्य, खुलवताना, मांडताना कसलंही बंधन नाही, नवे नियम तयार करण्याची संधीही दिली जाते. चौकटीतलं, बंधनातलं आयुष्य प्रत्येक माणूस जगत असतो, मुलंही त्याला अपवाद नाहीत. शिस्तीत उठायचं, शाळेला जायचं, गृहपाठ करायचा, खेळायला जायचं, अभ्यास करायचा, मोठ्यांच ऐकायचं, याचाही त्यांना कंटाळा येतोच. किमान यात कधीतरी नावीन्य हवं असं वाटतं.

इथे आईवडिलांचा धाक नाही, रोखायला टोकायला नाही म्हटल्यावर मुलं मोकळी वागतात, असा माझा अनुभव आहे. अर्थातच माझं त्यांच्याकडे लक्ष असतंच. गरज पडल्यास तटस्थ राहून काही गोष्टी मी सांगते, मुलं गुण्या-गोविंदाने ऐकतात. प्रस्तुती करणाच्या संदर्भात ते त्या गोष्टी अमलातही आणतात. या सगळ्या प्रक्रियेत मला फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं वाटतं. मुलं ही मुलांसारखीच वागतात. त्यांची कल्पनाशक्ती अफाट असते, त्यांचे विचार प्रोग्रेसिव्ह असतात. आपल्याला कधी कधी त्यांचे विचार तर्कशुद्ध वाटत नाहीत. कारण, आपण आपल्या अनुभवातून त्याकडे बघतो. पण, त्यांना जे दिसतं, दिसू शकतं त्याला मर्यादा नाही. उदाहरणार्थ, एक हत्ती असतो ज्याला सोंड नसते; पण सहा पाय असतात. हे ऐकल्यावर एकतर आपण हसण्यावर नेऊ, नाहीतर त्याला मुर्खात काढू. पण, तसं करायचं नसतं. कान देऊन ऐकायचं असतं. त्याला यावर चार प्रश्न विचारले, उदाहरणार्थ, मग हत्ती पाणी कसा पितो? अंघोळ कशी करतो? याचं त्याच्याकडे उत्तर असतं आणि तो त्या हत्तीसारखं वागून दाखवतो. इतर मुलांना पटल्यासारखं ते त्यांच्या हावभावाने सांगतात आणि मग त्याचं म्हणणं स्वीकारतात. प्रशिक्षकाने अशा वेळेला प्रेक्षकाच्या भूमिकेत शिरायचं असतं.

हा संपूर्ण प्रवास बघत असताना, एका नवीन जगात पोहोचल्याचा अनुभव मला मिळतो आणि मुलांना त्यांचं जग तयार करता येतं. नाट्यसृष्टीत सारं काही शय आहे हेच खरं!

मुलांच्या आयुष्यात जर आनंद असेल, तर ते दुःख सांगणारी कलाकृती सादर करतात. जर दुःख असेल, तर सारं जग कसं आनंदी आहे, हे दाखवण्यात आनंद मिळतो. एकमेकांशी जुळवून घेऊन कलेच्या माध्यमातून ते सादर करणं, म्हणजे एक कसरत असते. मेंदूला ताण द्यावा लागतो, इतर मित्रांची मनं जपावी लागतात. रॅडी, यांनी मला तसं केलं, हा मला असं म्हणतो, ही माझं काही ऐकूनच घेत नाही, असे मजेदार किस्से घडतात. मोठे मोठे विचार मांडणार्या मुलांची छोटी छोटी भांडणं पाहून, मला मोठं हसायला येतं. पण, इथे गालातल्या गालातच हसावे लागते. कारण, त्यांच्या करता त्या समस्या गंभीर असतात. म्हणूनच ते माझ्यापर्यंत त्या घेऊन आलेले असतात. मग यातून मार्ग एकच, पर्यायी मार्ग शोधा, एकमेकांना समजून घ्या आणि कलेतून व्यक्त व्हा. मुलांची भांडणं लवकर मिटतात, फारशी मध्यस्थी करावी लागत नाही. मोठे असते तर भांडत बसले असते. सांघिक कलेची हीच मजा आहे. वागायचं कसं ते शिकवते, ते ही नकळत.

सादरीकरण झाल्यावर मग भरतं चर्चासत्र. कोणी कसं काम केलं, कोणाचं कलेतून काय म्हणणं होतं, प्रेक्षकांच्या मनावर परिणाम काय झाला, सादर करत असताना कलाकाराला काय वाटत होतं, प्रस्तुतीकरणाच्या वेळेला समस्या काय आल्या. काय केलं असतं, तर अधिक चांगलं झालं असतं, मग त्याची प्रात्यक्षिकंसुद्धा करून दाखवली जातात. संहितेतच गडबड आढळून आली, तर सूचवलेल्या बदलातून ती पुन्हा सादर करायला सांगितली जाते. संघातल्या मुलांचं एकमेकांशी पटतच नसेल, तर मग दुसर्या संघाला तीच संहिता घेऊन नाटक सादर करायला सांगण्यात येतं.

ही प्रक्रिया सुरूच राहते. आयुष्यात घडलेली चुकीची किंवा चांगली घटना सुधारण्याची किंवा अनुभवायची संधी नाटक देतं. यातून निर्माण झालेल्या रस उत्पत्तीची चव फक्त नाटकातून मिळू शकते. कल्पनारम्य अभिनय करत नाटक सादर करणं, हा एक परिपूर्ण अनुभव आहे!

रानी राधिका देशपांडे

Powered By Sangraha 9.0