अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे नव्हे - मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना झापले

09 Aug 2025 17:44:17

नवी दिल्ली, श्रीकृष्णाविषयी अश्लील मजकूर असलेल्या फेसबुक पोस्टविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी निष्काळजीपणे बंद केल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना तीव्र शब्दांत फटकारले आहे. न्यायमूर्ती के. मुरली शंकर यांनी धार्मिक व्यक्तिमत्त्वांचे चित्रण संवेदनशीलतेने करण्याची गरज अधोरेखित करून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत असा इशारा दिला.

न्यायालयाने स्पष्ट केले की, हिंदू देवतांचा अपमानास्पद पद्धतीने केलेला उल्लेख, कोट्यवधींच्या भावना दुखावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न म्हणून पाहिला जाऊ शकतो. अशा कृतींमुळे धार्मिक तेढ, सामाजिक असंतोष आणि सांप्रदायिक सौहार्द बिघडू शकते. त्यामुळे धार्मिक प्रतिमा आणि प्रतीकांचा अपमान टाळणे आवश्यक आहे. न्यायालयाने असेही नमूद केले की, भगवान कृष्ण गोपींचे वस्त्र चोरण्याची कथा ही वैराग्य आणि भक्तिभावाची कसोटी दर्शवणारी, विविध प्रकारे प्रतीकात्मकरीत्या समजली जाणारी आहे. मात्र या प्रकरणातील फेसबुक पोस्टने स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडल्याचे स्पष्ट झाले आहे.

सदर पोस्टमध्ये भगवान श्रीकृष्ण गोपींचे वस्त्र चोरत असल्याचा फोटो आणि कृष्णजन्माष्टमी हा स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या व्यक्तीचा उत्सव असल्याचे अश्लील भाष्य होते. ही पोस्ट ‘सतीश कुमार’ नावाच्या फेसबुक खात्यावरून करण्यात आली होती. पि. परमशिवन यांनी या प्रकरणी तक्रार दाखल करताना पोस्टचा उद्देश हिंदू देवतांचा अपमान आणि हिंदू स्त्रियांची प्रतिमा मलिन करणे असल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून फेसबुककडून खात्याच्या मालकाची माहिती मागवली होती, मात्र आवश्यक तपशील न मिळाल्याचे कारण देत फेब्रुवारीत ‘निगेटिव्ह अंतिम अहवाल’ दाखल केला. मार्चमध्ये खंडपीठाने हा अहवाल स्वीकारत प्रकरण बंद केले, परंतु फिर्यादीला खाजगी तक्रार दाखल करण्याची मुभा दिली.

यावर नाराज फिर्यादीने उच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल केली. सुनावणीत न्यायालयाने पोलिसांनी केवळ फेसबुककडे माहिती मागवून तपास थांबवणे आणि अन्य कोणतीही सखोल चौकशी न करणे हे गंभीर दुर्लक्ष असल्याचे नमूद केले. न्यायालयाने पोलिसांना चौकशी पुन्हा सुरू करून तीन महिन्यांत अंतिम अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले.
Powered By Sangraha 9.0