मुंबई, रक्षाबंधनाच्या दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुंबई विमानतळावर तांत्रिक बिघाडाचा सामना लागला. तांत्रिक बिघाडामुळे विमानतळावरील 'सिस्टम डाऊन' झाल्याने चेक इन काऊंटवर मॅन्यूअल मोडवर तिकीट दिले जात होते. त्यामुळे प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तब्बल एका तासाभरानंतर प्रणाली पूर्ववत झाली व चेक इन काऊंटरवरील काम पूर्ववत झाले.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील डेटा नेटवर्क बिघाडामुळे देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात व्यस्त विमानतळावरील विमान सेवांसह इतर विमान सेवांमध्ये विलंब होईल, असे एअर इंडियाने शनिवार,दि.९ रोजी एका निवेदनात म्हटले आहे. साधारण संध्याकाळी साडे चारच्या सुमारास हा बिघाड झाला. मात्र, तासाभरातच सर्व सिस्टम पूर्ववत करण्यात आल्या. ऐन सणासुदीच्या दिवशी हा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.
याबाबत एअर इंडियाने प्रवाशांसाठी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. यात एअर इंडियाने म्हटलंय की, मुंबई विमानतळावर टी- 2 टर्मिनलवर डेटा नेटवर्कमध्ये बिघाड झाल्याने सिस्टम डाऊन झाल्या होत्या. यामुळे चेक इन काऊंटवर गर्दी वाढली असून प्रणालीमधील बिघाड दुरूस्त करण्यात आला आहे. बिघाडाचा फटका विमानांच्या टेक ऑफलाही बसला असून विमाने उशिराने झेपावत आहेत, असे एअर इंडियाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.