धारावी पुनर्विकासामुळे मूर्तीकारांना नवी आशा माझ्या नातवाला चांगलं आयुष्य लाभावं अशी इच्छा ! ८२ वर्षीय मूर्तिकार अण्णा शेडगेंना पुनर्विकासाची आस

Total Views |

मुंबई,
 धारावीच्या एका अरुंद गल्लीत, जिथे पावसाच्या सरींमुळे मातीचा सुगंध दरवळतो. याच गल्लीत ८२ वर्षीय ज्येष्ठ मूर्तिकार अण्णा शेडगे आपल्या कुटुंबासह गणेशोत्सवासाठी मूर्ती घडवण्याच्या कामात व्यस्त आहेत. मात्र यंदाचा हंगाम अण्णा शेडगेंसाठी केवळ व्यावसायिक संधी नसून, भविष्यासाठी नव्या आशेचा किरणही आहे.

"मी कायमच लहानश्या जागेत, चहुबाजूने धूळ आणि तुटपुंज्या साधनांमध्ये काम केलं. पण माझ्या नातवाला, सत्यमला, यापेक्षा चांगलं आयुष्य मिळावं अशी माझी इच्छा आहे," असं म्हणत मूर्तिकार अण्णा प्रेमाने शाडू मातीला आकार देतात. याच शाडू मातीशी येथील अनेक कुटुंबांचे गेल्या अनेक पिढ्यांपासून अगदी घट्ट नाते जोडले गेले आहे. शेडगे कुटुंब हे धारावीत मूर्ती बनवणाऱ्या अनेक कुटुंबांपैकी एक. त्यांना धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पातून केवळ घर नव्हे, तर मोकळं वातावरण आणि सुसज्ज कार्यशाळा मिळण्याची आशा आहे.

मात्र या आधीच्या परिस्थितीवर व्यक्त होताना अण्णा शेडगे म्हणतात '' इथे ना हवा खेळती, ना पुरेसा उजेड. अशा अपुऱ्या सुविधांमध्ये बाप्पाची पवित्र मूर्ती घडवणं हे केवळ काम नव्हे, तर कठीण साधना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मूळचे रहिवासी असलेले अण्णा शेडगे मुंबईत किशोरवयात आले. चिंचपोकळीच्या गणेशमूर्ती घडविणाऱ्या कलाकारांकडून त्यांनी कला आत्मसात केली आणि नंतर धारावीत स्वतःची छोटी कार्यशाळा उभी केली. "इथल्या लोकांनी मला आपलंसं केलं. मी इथेच माझं घर, व्यवसाय आणि आयुष्य घडवलं," असं ते आवर्जून सांगतात. आज त्यांच्या कलेचा वारसा सत्यम पुढे नेत आहे. सत्यमकडे रंगकामाचे विशेष कौशल्य आहे. विशेषतः गणपतीच्या डोळ्यांमध्ये प्राण फुंकणारी ती नजर रंगवताना दिसणारा त्याचे समर्पण. "सत्यमला आर्ट कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही, पण त्याच्याकडे नैसर्गिक कौशल्य आहे. आता फक्त एक सुसज्ज जागा हवी आहे, जिथे तो मनसोक्त काम करू शकेल," अण्णा असे आवर्जून सांगतात.

गणेशमूर्ती व्यवसायही काळानुसार बदलत आहे. पूर्वी आठ महिने चालणारा हंगाम आता चार महिन्यांपुरता मर्यादित झाला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींपेक्षा शाडू मातीच्या पर्यावरणपूरक मूर्तींना अधिक मागणी आहे. अण्णांच्या मते, हीच संधी आहे. "सत्यमसारख्या तरुणांना हे बदल सोपे जातील. जर सुसज्ज कार्यशाळा आणि एक छोटं विक्री केंद्र मिळाले, तर ग्राहक आपोआप येतील. आज आम्ही ग्राहकांची वाट पाहतो, उद्या ते आमच्याकडे चालत येतील," असे सांगताना अण्णांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटते.

अण्णा शेडगे यांच्या कार्यशाळेतील वातावरण कायम विविध आवाजांनी गजबजलेले आहे. तर आजूबाजूला रंगांचे ब्रश, अपूर्ण तयार झालेल्या गणपतीच्या मूर्ती अशा स्थितीत अण्णा शेडगे रोज आपलं काम करतात. "गणेशाची मूर्ती घडविणे हे फक्त काम नाही, ती एक साधना आहे. ही साधना पुढच्या पिढीनेही जपावी, पण ती करताना त्यांना सन्मान आणि प्रतिष्ठा लाभली पाहिजे," असं अण्णा यावेळी सांगतात.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.