"हा निर्णय अत्यंत..."; डोनाल्ड ट्रम्प यांनी दुप्पट टॅरिफ लादल्यानंतर भारताचंही रोखठोक उत्तर!

07 Aug 2025 11:22:13

नवी दिल्ली : (Randhir Jaiswal On Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता ट्रम्प यांनी भारतावर आणखी २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे आता अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारे एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. दरम्यान, या निर्णयानंतर भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, अन्याय्य आणि असमर्थनीय असल्याचे म्हटले आहे.

रणधीर जयस्वाल यांनी काय म्हटलं?

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, "इतर अनेक देशांनी स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी केलेल्या कृतींसाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही पुन्हा सांगतो की ही कृती अन्याय्य, असमर्थनीय आणि अतार्किक आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलेल", असे रणधीर जयस्वाल यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादण्याची घोषणा केल्यामुळे आता अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारे एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या नव्या कार्यकारी आदेशानुसार हे नवे टॅरिफ २१ दिवसानंतर लागू होणार आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली असून अमेरिकेत भारतीय वस्तू महागणार आहेत. याचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.


Powered By Sangraha 9.0