राहुल गांधी यांचा आरोप साफ खोटा – केंद्रीय निवडणूक आयोगाचे ‘फॅक्टचेक’

07 Aug 2025 18:38:34

नवी दिल्ली :  लोकसभा निवडणूक २०२४ आणि त्यानंतर झालेल्या विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचा साफ खोटा असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांचे हे आरोप पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणार आहेत, असे सांगून केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर या दाव्याचे ‘फॅक्टचेक’ केले आहे. त्याचप्रमाणे आयोगाकडून राहुल गांधी यांच्या आरोपांचे मुद्देसूद खंडन येणेही अपेक्षित आहे.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि इतर काही राज्यांच्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप केला. त्यामध्ये त्यांनी कर्नाटकातील मतदारसंघाचे उदाहरण दिले. मात्र, कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे की, निवडणूक नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने मतदार यादीच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर त्याला लेखी माहिती द्यावी लागते. राहुल गांधी यांनी नियम २० (३) (ब) अंतर्गत प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करून अशा मतदारांची नावे प्रदान करावीत अशी अपेक्षा आहे, जेणेकरून त्यांच्या दाव्यांची चौकशी करता येईल आणि आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई देखील सुरू करता येईल; असेही कर्नाटक निवडणूक आयोगाने म्हटले आहे. प्रतिज्ञापत्र कशा प्रकारचे असावे, याचा नमूनादेखील आयोगाने दिला आहे.

त्याचवेळी, आपण कोणत्याही प्रकारचे प्रतिज्ञापत्र लिहून देणार नाही असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0