नवी दिल्ली : भारतातील शेतकऱ्यांचे हित आमच्यासाठी सर्वोच्च असून त्यांच्या हितासोबत कोणतीही तडजोड केली जाणार नसून त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहोत, असा ठाम संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेस दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी एम.एस. स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेने लादलेल्या शुल्काविरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कठोर शब्दात इशारा दिला आहे. पंतप्रधान म्हणाले, आमच्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचे हित हे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत आपले शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादकांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. त्यासाठी आम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल याची कल्पना असून आपल्यासह संपूर्ण देश त्यासाठी तयार आहे, असा ठाम संदेश पंतप्रधानांनी दिला आहे.
अमेरिकेस सोयीस्कर असा व्यापार शुल्क करार करण्यास भारताने ठाम नकार दिला आहे. वाटाघाटींदरम्यान अमेरिकेकडून भारताच्या कृषी बाजारपेठेत, विशेषतः मका, सोयाबीन आणि कापूस क्षेत्रात अधिक प्रवेश मिळवण्यासाठी जोर दिला जात होता. त्याचप्रमाणे दुग्ध आणि मासळीच्या क्षेत्रातही मनमानी करण्याचा अमेरिकेचा भर होता. त्यामुळे भारतीय बाजारपेठ, शेतकरी, दुग्धउत्पादक आणि मच्छिमारांच्या हितांवर थेट बाधा येणार आहे. त्यामुळे भारताने त्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळेच ट्रम्प प्रशासनाची सध्या चिडचीड सुरू आहे.