अमेरिकेच्या वाढीव टॅरिफबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

07 Aug 2025 22:05:37

मुंबई : अमेरिकेने वाढवलेल्या टॅरिफचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतो, याबाबतचा आढावा घेण्यासाठी गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.

या बैठकीस मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, राज्यकर, वस्तू व सेवा कर आयुक्त आशिष शर्मा, उद्योग सचिव डॉ.पी. अन्बळगन, ‘मित्रा’चे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल तसेच, ‘मित्रा’चे अर्थ तज्ज्ञ संजीव सक्सेना, मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक सत्यनारायण कोठे आणि अर्थतज्ञ ऋषी शाह यांनाही निमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी जीडीपी, रोजगार, वाणिज्य आदी महत्वाच्या मुद्द्यांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे राज्यातील निर्यातप्रधान उद्योगांवर संभाव्य परिणाम तसेच जागतिक बाजारातील स्पर्धात्मकतेवर होणारे परिणाम याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अर्थव्यवस्था बळकट ठेवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध

राज्यातील उद्योगांचे हित आणि अर्थव्यवस्था बळकट ठेवण्यासाठी केंद्र सरकारशी तातडीने समन्वय साधून आवश्यक उपाययोजना आखण्यात येतील. या अनुषंगाने केंद्र सरकारकडून मार्गदर्शन घेण्यात येईल. राज्यातील उद्योगांचे हित जोपासण्यासाठी आणि अर्थव्यवस्था बळकट ठेवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0