व्यायामासाठी गेलेल्या सहा जणांना भरधाव ट्रकनं चिरडलं! चौघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

07 Aug 2025 11:56:37


गडचिरोली : (Gadchiroli Accident) गडचिरोलीतील नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आरमोरी येथे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. काटली गावाजवळ सकाळी भरधाव ट्रकने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा विद्यार्थ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेत एकूण चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली आरमोरी मुख्य मार्गावरील काटली येथील नाल्याजवळ हे सहाही विद्यार्थी मार्निंग वॉकसाठी गेले होते. यावेळी रस्त्यावर व्यायाम करत असताना एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान आणखी दोन जणांनी प्राण गमावले. उर्वरित दोन जखमींची प्रकृती चिंताजनक असून, पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने त्यांना नागपूरला रवाना करण्यात आलेले आहे.

मृतांमध्ये पिंकू भोयर (वय १४), तन्मय मानकर (वय १६) यांचा जागीच मृत्यू झाला तर दिशा मेश्राम आणि तुषार मारबते यांचाही रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दरम्यान या भीषण अपघातानंतर दोन गंभीर जखमी मुलांना नागपूरला हेलिकॉप्टरने नेण्यात आले. यामध्ये क्षितिज मेश्राम आणि आदित्य कोहपते अशी जखमींची नावे आहेत. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. सध्या गडचिरोलीतील गावकऱ्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अपघाताच्या निषेधार्थ संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्या आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.



Powered By Sangraha 9.0