मोखाडा :ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने सेवा सहयोग फाउंडेशनच्या बुक बँक प्रकल्पाअंतर्गत मोखाडा (पालघर) व त्र्यंबकेश्वर (नाशिक) तालुक्यातील शाळांना भेट देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे संच वाटप करण्यात आले.
मोखाडा येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील इयत्ता अकरावी व बारावीच्या १६० विद्यार्थ्यांना एकूण १०४० पुस्तकांचे संच वितरित करण्यात आले. ही शाळा रयत शिक्षण संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असून, प्राचार्य म्हणून श्री. अर्जुन लक्ष्मण शेळके कार्यरत आहेत.
या उपक्रमाबाबत श्री. तुकाराम लोंढे (माध्यमिक शिक्षक) यांनी सांगितले की, "२०१० पासून विद्यार्थ्यांना अत्यल्प शैक्षणिक साधनांवर शिकावे लागत होते. मात्र २०२२ पासून सेवा सहयोग फाउंडेशनच्या बुक बँक प्रकल्पामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र पुस्तक संच मिळू लागल्याने अभ्यासात आणि निकालात लक्षणीय सुधारणा झाली आहे."
कार्यक्रमात श्री. जितेंद्र कामळी (असिस्टंट मॅनेजर सेवा सहयोग फाउंडेशन) यांनी प्रकल्पाची माहिती देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्राचार्य शेळके यांनी संस्थेचे आभार मानून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. श्री. निलेश चोरमल (उच्च माध्यमिक विभाग प्रमुख) यांनी अभ्यासासाठी पुस्तकांची उपयुक्तता अधोरेखित केली. सूत्रसंचालन श्री. लोंढे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सेवा सहयोग फाउंडेशनच्या प्रतिनिधींना शाळेच्या वतीने फुलांचे बुके देऊन सन्मानित करण्यात आले.
यानंतर फाउंडेशनच्या टीमने खर्षेण (ता. त्र्यंबकेश्वर) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेला भेट दिली. शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भविष्यातील उपक्रमांसाठी आवश्यक मदत करण्यात येईल, असे फाउंडेशनने स्पष्ट केले.