मुंबई : (Bombay High Court On Pigeon Feeding) गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर कबुतरखाना हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई महापालिकेने नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन हा कबुतरखान्यावर कारवाई करत ताडपत्रीने झाकून बंद केला होता. या निर्णयानंतर जैन समाजाने आक्रमक पवित्रा घेत ही ताडपत्री हटवली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी ७ ऑगस्टला सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने आपला आधीचा निर्णय कायम ठेवत कबुतरखाना बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
निकाल देताना न्यायालयाने नेमके काय म्हटले आहे?
मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबूतरखान्यांवर बंदीचा आधीचा निर्णय कायम ठेवला आहे. सोबतच हा निर्णय देतावा आमच्यासाठी नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे, असं न्यायालयाने म्हटले आहे. आम्ही दिलेल्या आदेशाचा कोणीही अवमान करू नये, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. तसेच आमच्या निकालावर जर तुमची हरकत असेल तर तुमच्याकडे आदेशाविरोधात दाद मागण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. आमच्या निकालाचा अवमान न करता कायदेशीर मार्गाने हरकत घ्या, असे न्यायालयाने सांगितले आहे.
कबुतरखान्यासंदर्भात तज्ञसमिती गठित करण्याचे आदेश
कबुतरखान्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याच्या सूचना न्यायालयाकडून देण्यात आल्या. या समितीचा अहवाल सगळ्यांसाठी बंधनकारक असल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आले. नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे, असे न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नमूद केले. कबुतरांना अन्न, पाणी घालण्यावर असलेली बंदी न्यायालयाने कायम ठेवली.