ban
मुंबई : आमच्यासाठी नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने कबूतरखान्यांवर बंदीचा निर्णय कायम ठेवला आहे. गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी याबाबतची सुनावणी पार पडली.
कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनासह अनेक आजार होत असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर बंदी आणली होती. त्यानंतर मुंबईतील कबुतरखान्यासंदर्भात वातावरण तापले असून बुधवारी दादरमधील कबुतर खान्यावर कबुतरप्रेमींकडून मोठे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री काढून टाकत काही लोकांनी कबुतरांना खाद्य दिले.
मात्र, आता उच्च न्यायालयाने कबुतरांना दाणापाणी न देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. तसेच, तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले असून आमच्यासाठी नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच आम्ही दिलेल्या आदेशाचा कोणीही अवमान करू नये. आमच्या निकालावर जर तुमची हरकत असेल तर तुमच्याकडे आदेशाविरोधात दाद मागण्याचे पर्याय उपलब्ध आहेत, असेही न्यायालयाने सांगितले.
कबुतरखान्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. येथील पक्ष्यांसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाऊ शकतो, असेही न्यायालयाने म्हटले. १३ ऑगस्ट रोजी याप्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.