मंत्र मातृका पुष्पमाला स्तोत्र ( भाग ५ )

06 Aug 2025 22:16:55

श्लोक क्रमांक ८

कल्हारोत्पलमल्लिकामरुवकैः सौवर्णपङ्केरुहै-
र्जातीचम्पकमालतीवकुलकैर्मन्दारकुन्दादिभिः |
केतया करवीरकैर्बहुविधैः कप्ताः स्रजो मालिकाः
सङ्कल्पेन समर्पयामि वरदे सन्तुष्टये गृह्यताम् ॥ ८॥


या श्लोकाचा आरंभ श्रीविद्येच्या पंचदशी मंत्रातील, कामराजकूट्या दुसर्या कूटामधील तिसर्या बीज ‘क’ (क)पासून होतो. हे ‘कामराज’ बीजइच्छा, आकर्षण निर्माण करणारे आणि भोग भोगून तृप्त होऊन, ब्रह्मानंदाची अनुभूती देणारे आहे. या श्लोकाद्वारे आचार्य, देवीच्या चरणी स्थूल स्वरूपात पुष्पांजली अर्पण करतात आणि मानसपूजेद्वारे प्रेम, भक्ती आणि समर्पण यांच्या समभावातून उमललेले आत्मपुष्पही अर्पण करतात.

आचार्य जगन्मातेला म्हणतात, आई, मी माझ्या संकल्पाने कल्पिलेल्या अनेक पुष्पांच्या माळा तुझ्या गळ्यात घालण्यासाठी आणल्या आहेत. कल्हार म्हणजे श्वेत कमल, रक्त कमल, मोगर्याची फुले, मरुबक म्हणजे कोरांटीची फुले आणि सुवर्णकमळे, जाई, चाफा, बटमोगरा, बकुल, कल्पवृक्ष, कुंद आणि पारिजातक अशी अनेक प्रकारची भिन्न भिन्न सुगंध असणारी, औषधी गुणधारण करणारी फुलेही मी घेऊन आलो आहे. केवड्याच्या कणसाची पाने, विविध रंगांच्या कण्हेरीची फुलेसुद्धा मी आणली आहेत. या सर्व पुष्पांच्या संकल्परूपी माळा तयार करून, मी तुझ्या गळ्यात घालतो आहे. कृपया यांचा स्वीकार करून, माझ्या या पुष्पमाला उपासनेला पूर्णत्व प्रदान कर.

हे भगवती! मी माझ्या मनातून या चैतन्यमय पुष्पांच्या माळा तुझ्या चरणी अर्पण करतो. तुझ्या केशांमध्ये, मस्तकावर आणि गळ्यात वाजणार्या माळांमध्ये, या दिव्य सुवासिक फुलांचा अलंकार तू स्वीकार कर. हे वरदायिनी! हे जगद्गुरू माते! हे सर्व सुखदायिनी! फक्त तुझ्या आनंदासाठीच मी हे पुष्प अर्पण करत आहे.

हा पुष्पसंभार आचार्य केवळ गळ्यात धारण करण्यासाठी आणत नाहीत, तर काही फुलांच्या माळा आणि गजरे आपल्या कपर्दिनी अर्थात केशसंभाराचा बुचडा केला आहे, त्यात माळण्याचीही विनंती ते देवीला करतात. केशांच्या जटा जिथे बांधल्या जातात, त्याच ठिकाणी ‘ऑब्लांगेटा’ हा मेंदूतील महत्त्वाच्या चेतातंतूंंचा समूह असतो. हे चेतातंतू श्वासोच्छवास, मनाचे संतुलन आणि मानसिक ऊर्जेचे नियंत्रक म्हणून कार्य करतात. इथेच बिंदू विशुद्धी चक्र असते. जे जागृत झाल्यावर, भविष्य दर्शनाचे सामर्थ्य प्राप्त होते. ब्रह्मांडातील ऊर्जेचा प्रवाह शरीरात प्रवेश करतो, त्याचप्रमाणे ध्यानसाधनेतही प्रगती होते.

फुलांचा गंध, रंग आणि ऊर्जेला जुळवून साधकाच्या देहातील चक्राला सक्रिय करतो. ही केवळ एक पुष्पमाला नसते, तर ही मानसिक, आध्यात्मिक साधनेची साखळी आहे. ज्यामार्फत साधक देवीशी तादात्म्य पावू शकतो. साधक आता देवीला बाह्य नव्हे, तर मनातून अर्पण करतो आहे. त्याचे मन फुलांच्या माळांमध्ये गुंफले गेले आहे. एका मागोमाग एक पुष्प त्याच्या श्रद्धेने ओवून, देवीच्या चरणी ठेवले जाते. हे पुष्पमालार्पण अद्वैत भावाने बघितले, तर ते इंद्रियांची निवृत्ती, वासनांचा त्याग आणि सांसारिक मोहांचा क्षय घडवून, विशुद्ध भक्ती आणि मोक्षानुगामी वृत्तीचा विकास घडवते. या श्लोकाद्वारे साधकाने, देवीच्या अलंकारपूजनाची पूर्णता साधली आहे. आता देवी अलंकृत आहे, प्रसन्न आहे आणि भक्ताच्या अंतःकरणात तिने स्थान घेतले आहे.

श्लोक क्रमांक ९

हन्तारं मदनस्य नन्दयसि यैरङ्गैरनङ्गोज्ज्वलै-
र्यैर्भृङ्गावलिनीलकुन्तलभरैर्बध्नासि तस्याशयम् |
तानीमानि तवाम्ब कोमलतराण्यामोदलीला गृहा-
ण्यामोदाय दशाङ्गगुग्गुलुघृतैर्धूपैरहं धूपये ॥ ९॥


हा श्लोक श्री विद्येच्या पंचदशी मंत्रातील दुसर्या कामराज कूटमधील, चौथे बीज ‘ह’ (ह)पासून आरंभ होतो. या बीजातून इच्छा, सौंदर्य आणि सृजनाचे आकर्षण प्रकट होते.

या श्लोकाला शक्तीच्या सती अवताराचा संदर्भ आहे. सतीच्या आत्मत्यागामुळे, शिव विरक्त होऊन ध्यानमग्न झालेले असतात. तारकासुराची दहशत वाढलेली असते आणि त्याचा अंत फक्त शिव आणि पार्वतीच्या पुत्राकडूनच संभव असतो. पार्वतीच्या रूपाने देवीने हिमालय पर्वताच्या पोटी जन्म घेऊन, तिने तारुण्यात पदार्पण केलेले असते. ती शिवाच्या प्राप्तीसाठी कठोर लीन होते. परंतु, शिवाची समाधीही भंग होणे आवश्यक असते. इंद्र हे कार्य मदनाकडे अर्थात कामदेवाकडे सोपवतात. कामदेव पुष्पबाण मारून शिवाची समाधी भंग करतात. शिवाची समाधी भंग होते आणि त्यांच्या तृतीय नेत्र कटाक्षाने, कामदेव भस्मीभूत होतो. इकडे पार्वतीचे अलौकिक रूप, मोहक केशरचना आणि एकंदरच सौंदर्य पाहून, शिव तिच्यावर भाळतो परंतु, यासाठी कामदेवाला देहार्पण करावे लागते. देवीच्याच आशीर्वादाने कामदेव देहधारी तर होऊ शकत नाही परंतु, सूक्ष्मरूपाने तो सर्व जीवांच्या मनावर राज्य करतो. शंकर-पार्वतीच्या या मिलनातून पुन्हा एकदा सृष्टीचक्र चलित होते. आचार्य याच संदर्भाने देवीची स्तुती करत असून, आपल्या मानसपूजेत तिला धुपार्पण करत आहेत.

आचार्य म्हणतात, ज्याने मदनाला भस्म केले, त्या शंकराला तू आपल्या कोमल आणि सुंदर अंगांनी रमवितेस. तुझा केशसंभार भ्रमरांच्या मालिकेप्रमाणे कृष्णवर्णी कुरळा आणि अत्यंत नयन मनोहर आहे. तुझ्या सुंदर केशांमध्ये शिव बद्ध झाले आहेत. तुझा सुंदर देह जणू त्यांची लीलागृहेच आहेत. या तुझ्या समस्त कोमल गात्रांना आणि केशसंभाराला, मी तुपाने माखलेल्या दशांगगुग्गुळाच्या धुपाने सुगंधित करतो आहे. माझ्या या धूप समर्पणाने तू तृप्त हो.

दशांगधूप म्हणजे, दहा प्रकारच्या औषधी झाडांची साल, हरित पदार्थ आणि सुगंधी राळे यांचा एकत्रित धूप. हे चंदन, गुग्गुळ, नागरमोथा, वाळा, इत्यादींचे मिश्रण जळत्या निखार्यांवर टाकले जाते, ज्यातून अत्यंत शुद्ध आणि सात्विक धूर निघतो.

हे धुपार्पण करताना एक श्लोक म्हणण्याचा प्रघात आहे. धूपंगृहाणतेजस्विपापंमेदहमेऽनघे| अर्थात हे तेजस्वी देवी! हा धूप तू स्वीकार कर आणि माझे सर्व पाप अग्नीत भस्मिभूत करून टाक.

या श्लोकात आचार्यांनी देवीच्या सौंदर्याचे आणि शिव-पार्वतीच्या सामरस्याचे चिंतन केले आहे. इथे धुपाच्या जोडीला मनातील सर्व विकारांना जाळून, आचार्य चित्ताचे सात्विक आणि सुवासिक स्वरूप देवीच्या चरणी अर्पण करत आहेत.
Powered By Sangraha 9.0