
भारत-फिलीपिन्स दृढ संबंधांच्या पंच्याहत्तरीच्या निमित्ताने, पूर्वी एशिया-पॅसिफिक प्रदेशाला आता ‘इंडो-पॅसिफिक प्रदेश’ म्हणून प्राप्त झालेली प्रादेशिक ओळख, हा आशियाई क्षेत्रात दबदबा निर्माण करू पाहणार्या भारताचे पहिले पाऊल म्हणावे लागेल.फिलीपिन्स हा दक्षिण आशियातील एक महत्त्वाचा देश. रचनात्मक विकास, अर्थकारण आणि सांस्कृतिक धाग्यांनी भारताशी जोडलेला एक भूभाग. तसेच, आर्थिक विकासदराच्या शर्यतीतही भारताप्रमाणेच झपाट्याने विकास करणारा एक देश. ११.३ कोटी लोकसंख्येचा हा देश शेकडो बेटांवर वसलेला असला, तरीही तीन लाख चौरस किमी इतका विस्तार असलेले द. आशियातील हे महत्त्वाचे राष्ट्र. आर्थिकदृष्ट्या जगात ३२वा, तर आशियात नवव्या स्थानी असलेल्या या देशाने भारताशी कायम मैत्री जपली.
उत्तरेला चीनशी कायम संघर्ष करणारा तैवान, पश्चिमेला व्हिएतनाम पूर्वेला अथांग असा फिलीपिन्सचा समुद्र आणि दक्षिणेला इंडोनेशिया, पापुआ न्यू गिनी अशा देशांच्या सागरी सीमा लाभलेल्या या देशाचे भौगोलिक महत्त्व भारत जाणून आहे. याच अनुषंगाने भारताने फिलीपिन्सशी मैत्रीचे संबंध अधिक दृढ केले. आपल्या शेजारील ड्रॅगनची वळवळ शांत करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जाऊ शकते.
फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनेंड मार्कोस सध्या भारत दौर्यावर आहेत. त्यांनीच ‘आशिया-पॅसिफिक’ ऐवजी ‘इंडो-पॅसिफिक’ असा शब्दप्रयोग रुढ केला होता. याचाच अर्थ या संपूर्ण आशियाई राष्ट्रांच्या यादीत भारताचे स्थान प्रमुख आहेच. शिवाय भारत त्यांचा रक्षणकर्ताही आहे, असा संदेश जागतिक पटलावर स्पष्टपणे जातो. भारत-फिलीपिन्स संबंधांच्या नव्या अध्यायाची सुरुवात होण्याच्या दृष्टीने संरक्षण करारांना महत्त्व प्राप्त झालेले आहे. दि. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनात फिलीपिन्सच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले. भारत-फिलीपिन्स संबंधांची ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दोन्ही देश आपल्या रणनीतिक आणि आर्थिक संबंध मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत.
रशियाकडून आयात होणार्या तेलाच्या मुद्द्यावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताविरोधात आयातशुल्क लादत आहेत. चीन पूर्वीपासूनच भारताविरोधात पाकिस्तानच्या मदतीला धावून येतो. या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताला आशिया आणि आफ्रिकन देशांपुढे एक पर्याय म्हणून उभे राहणे गरजेचे आहे. या छोट्या-छोट्या देशांची मैत्रीच भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मार्कोस यांचे पिताश्री भारताचा दौरा करणारे फिलीपिन्सचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले होते. आता त्यांचेच पुत्र फिलीफिन्समध्ये सत्तेत आहेत. त्यामुळे भारताशी त्यांचे एक परंपरागत भावनिक नातेही आहेच.
भारताने फिलीपिन्सला अनेक व्यापार निर्बंधांतून मुक्त केले आहे. मुळात फिलीपिन्सचे प्रमुख खाद्य तांदूळ. फिलीपिन्सहून तांदूळ मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. भारताला २०२४ साली एकूण २० हजार टन तांदूळ निर्यात करण्यात आला. दोन्ही देशांचा व्यापार एकूण ३.३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला. मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळापासून हा व्यापार ६३ टक्क्यांपर्यंत वृद्धिंगत झाला. यात फार्मा कंपन्यांनी बाजी मारली. एकूण निर्यातीच्या १६ टक्के ही फार्मा कंपन्यांनीच व्यापली आहे. याशिवाय इंजिनिअरिंग उत्पादने, वाहनांचे सुटे भाग, रसायने आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचाही समावेश आहे.
भारत-फिलीपिन्स सांस्कृतिक संबंधांची किनार लक्षात घेता, तेथील पर्यटकांना भारतात येण्यासाठी व्हिसामुक्त करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी थेट विमानसेवाही सुरू करण्यात येणार आहे, ती अखंड सुरू राहील, यासाठीही भारत प्रयत्नशील असणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील पर्यटन वाढण्याची शयता आहे. यानंतर सर्वांत महत्त्वाचा मुद्दा ज्यासाठी भारताने फिलीपिन्सला दिलेली मोकळीक महत्त्वाची ठरते, ती म्हणजे सागरी सुरक्षा. चीनला कोंडीत पकडण्यासाठी फिलीपिन्सची भूमी केव्हाही उत्तम. त्यामुळे भारत-फिलीपिन्सच्या दोन्ही नेत्यांनी संरक्षण आणि सागरी सहयोगावर अधिकचे लक्ष केंद्रित केले. ‘मेक इन इंडिया’ या आग्रही योजनेचे सर्वांत मोठे यश म्हणजे, हा भारत-फिलीपिन्स क्षेपणास्त्र करार. दि. २८ जानेवारी २०२२ रोजी या करारावर स्वाक्षर्या झाल्या असून, अंदाजे एकूण ३ हजार, १३१ कोटी रुपयांचा हा करार आहे. त्यापैकी एप्रिल २०२४ रोजी ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रे पुरवली होती. भारतीय वायुसेनेच्या ‘सी-१७ ग्लोबमास्टर’ विमानद्वारे ही क्षेपणास्त्रे पाठविण्यात आली होती. ‘ब्रह्मोस’ विकत घेणारा फिलीपिन्स हा पहिला देश. दोन्ही देशांच्या नौदलाचा युद्धाभ्यास सराव सुरू असतो. द. चिनी समुद्रात चीनकडून होणार्या कुरापतींना चाप लावण्यासाठी हा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. शिवाय इंडो-पॅसिफिक क्षेत्रात दबदबा निर्माण करण्यासाठी, दोन्ही देशांना सागरी सीमांवर करडी नजर ठेवणे आणि नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठीही यानिमित्ताने मदत होईल. दोन्ही देशांचा अंतराळ क्षेत्रातील सहकार्यावरही भर आहे. ज्यामुळे भारताचे तंत्रज्ञान वापरून फिलीपिन्सला अचूक हवामानाचा अंदाज बांधता येईल. कृषी क्षेत्रातील सुधारांवर भर देता येईल. दोन्ही देशांमध्ये होणारा व्यापार लक्षात घेत, भारताने मुक्त व्यापार करारही महत्त्वाचा आहे. ‘कोरोना’ काळातही भारताने या देशाशी मैत्री निभावली होती. ‘व्हॅसिन मैत्री’ या कार्यक्रमांतर्गत भारताने या देशालाही संकटकाळात मदतीचा हात दिला. अनेक फिलीपिन्सचे अनेक विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. आयटी, विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रांकडे त्यांचा प्रामुख्याने कल दिसून येतो.
भारतातून जगभरात पसरलेला बुद्ध धर्म हा फिलीपिन्ससाठीही तितकाच महत्त्वाचा. त्यामुळे या देशाशी भारताचे सांस्कृतिक आणि धार्मिक नातेही तितकेच दृढ. चीन तिबेट आणि तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांच्यासोबत चीन करत असलेल्या व्यवहाराने फिलीपिन्ससुद्धा अनभिज्ञ नाही. दलाई लामांचे भारताशी असलेले नाते पाहता, फिलीपिन्सच्या नागरिकांमध्येही एक वेगळी भावना आहे. या कारणास्तव सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, व्यापार, अर्थकारण आणि महत्त्वाचे म्हणजे संरक्षण, अशा सर्वच क्षेत्रांतील आघाड्यांवर भारत फिलीपिन्सच्या सोबत आहे.
द. चिनी समुद्र हा जगातील सर्वाधिक समुद्री व्यापारी वाहतुकीचा मार्ग. फिलीपिन्स आणि अन्य देश यांनी उघडलेली चीनविरोधातील आघाडी भारताच्या पथ्थ्यावर पडणारी आहे. भारत त्यांना आपलासा वाटू लागतो. चीनच्या विस्तारवादी मनसुब्यांना चाप लावण्यासाठी उभय देशांसाठी ही रणनीती गरजेचीच. डोकलाम आणि गलवान खोर्यातून भारताला चीन वारंवार आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे. अशावेळी फिलीपिन्स सोबत असल्यास ड्रॅगनच्या शेपटावर पाय देणे सहज शय आहे. एक मोठा भाऊ म्हणून द. आशियातील या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व भारत करू इच्छित आहे. यापूर्वी कितीही कडवट भूमिका घेतली, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मालदीव दौरा करत हे दाखवून दिलेच आहे.