मुंबई : कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतात खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' संबंधित दूतावास उभारले आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जरच्या समर्थकांनी एका गुरुद्वाराबाहेर 'खलिस्तान दूतावास' असा बोर्ड लावला होता. हा धक्कादायक प्रकार घडल्या नंतरही खलिस्तान्यांच्या या कृत्यावर पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याकडून कोणतेही अधिकृत विधान आले नाही.
कॅनडामधील खलिस्तानी कारवायांबद्दल भारताने यापूर्वी अनेक वेळा चिंता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत अशा घटनेची पुनरावृत्ती होणे खूप धक्कादायक आहे. दुसरीकडे, ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा खलिस्तानी संघटना 'शीख फॉर जस्टिस' ने कथित 'शीख जनमत' जाहीर केले. सुरक्षा यंत्रणांना भीती आहे की केवळ भारतविरोधी वातावरण भडकवले जात नाही तर भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्यासाठी परदेशातील भूमीचा वापर केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही काळानंतर तो फलक काढून टाकण्यात आला, मात्र समाज माध्यमांवर त्याचे फोटो व्हायरल झाल्यामुळे चर्चाना उधाण आले आहे. सध्या स्थानिक आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्था खलिस्तान चळवळीशी संबंधित या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येते आहे.