मुंबई : (Dadar kabutar Khana) गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कबुतरखान्यांवरुन वाद सुरु आहे. त्यातच दादरमधील ऐतिहासिक कबुतरखाना बंद केल्यामुळे कबूतरखाना परिसरात जैन समाजाकडून आंदोलन करणार होते. मात्र, हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते. आता मात्र, जैन समाज मोठ्या संख्येने कबूतरखाना परिसरात पोहोचला आहे. त्यांच्याकडून कबूतरखान्यातील ताडपत्री काढण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
कबुतरखान्याजवळ जैन समाजाचे आंदोलक आक्रमक झाल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडून कबूतरखान्यावरील ताडपत्री काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही महिला या कबूतर खान्यात उतरल्या असून महापालिकेने लावलेली ताडपत्री त्यांनी काढून टाकली आहे. या घटनेनंतर जैन समाजाच्या भावना या अधिक तीव्र होताना दिसत आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्याचे काम सध्या सुरू आहे.
मंगल प्रभात लोढा यांची प्रतिक्रिया
दादरमध्ये सुरु असलेल्या गोंधळावर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "सध्या कबुतरखान्याजवळ जी काही घटना सुरु आहे, त्याचे मी समर्थन करत नाही. हे सर्व बरोबर नाही. हे कोण करतंय मला माहिती नाही, अशी मी विनंती करतो", अशी प्रतिक्रिया मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.