नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात ‘शेती उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ विषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला. केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता नुकताच वितरित करण्यात आला. त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. त्यात जागतिक कीर्तीचे संगणक तज्ज्ञ श्री. सुनील खांडबहाले यांनी ‘शेतकऱ्यांना शेती उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करून पिकांवरील समस्या, कीड, रोग आणि पाणी व्यवस्थापनाचा शेतकरी अचूक अंदाज घेऊ शकतात. यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढवणे शक्य होईल, असे श्री. खांडबहाले यांनी सांगितले. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार झालेल्या या कार्यक्रमात पेठ, त्र्यंबकेश्वर, आणि नाशिक तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, नाशिकचे उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र वाघ, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नितीन ठोके, राजाराम पाटील, हेमराज राजपूत, डॉ. प्रकाश कदम, मंगेश व्यवहारे, संदीप भागवत, आणि अर्चना देशमुख आदी उपस्थित होते.