नवी दिल्ली : बिहारमध्ये १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मसुदा मतदार यादीवर आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाकडून एकही दावा किंवा हरकत दाखल करण्यात आलेली नाही, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. त्याचवेळी मतदारांकडून थेट ३,६५९ दावे आणि हरकती दाखल झाल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
विशेष सघन पुनरीक्षण सध्या बिहारमध्ये सुरू असून, त्यात १८ वर्षे पूर्ण केलेल्या १९,१८६ नवमतदारांकडून अर्ज प्राप्त झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, प्राप्त झालेले दावे आणि हरकती सात दिवसांची मुदत संपल्यानंतर संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून निकाली काढले जातील. तसेच, कोणतेही नाव मसुदा यादीतून योग्य चौकशी, लेखी कारणांसहित आदेश आणि संबंधित व्यक्तीला संधी दिल्याशिवाय काढता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश आयोगाने दिले आहेत.
दरम्यान, या प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करत ६५ लाख नावे निवडणूक यादीतून हटवण्यात आल्याचा आरोप करत असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या याचिकेवर प्राथमिक सुनावणी घेऊन आयोगाकडून खुलासा मागवला आहे.