संविधानविरोधी घराणे

06 Aug 2025 21:43:02

तुम्ही खरे भारतीय असता, तर असे बोलला नसता,” हे न्यायालयाने नुकतेच राहुल गांधींना फटकारले ते बरे केले. कारण, राहुल गांधींना मागे भारतीय सैन्याचा अपमान करण्यासाठीच जणू म्हटले होते की, ‘चीनने भारताच्या सीमा भागातील दोन हजार किमी जमिनींमध्ये घुसखोरी केली आहे.’ यावर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी संविधानयुक्त न्यायालयातील न्यायाधीशांचा अपमान केला. त्यांनी न्यायालयाला प्रश्न केला की, "न्यायाधीश कोण आहेत हे ठरवणारे की, राहुल गांधी भारतीय आहेत की नाही?” त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते की, भारतीय संविधानयुक्त न्यायव्यवस्थेच्या न्यायाधीशांना प्रियांका आणि पर्यायाने काँग्रेसच्या मते शून्य किंमत आहे.

काँग्रेस आणि त्यांचे समविचारी पक्ष संविधान धोक्यात नसतानाही नेहमीच ‘संविधान खतरे में, संविधान बचाव’ असे म्हणत असतात. मात्र, त्यांच्याच नेत्या असलेल्या प्रियांका गांधींनी संविधानयुक्त न्यायालयाचा परवा असा अपमान केला. अर्थात, संविधानाची काळजी किंवा आदर या लोकांना कधी तरी होता का? हा प्रश्न आहेच. प्रदीर्घ सत्ताकाळात काँग्रेसने संविधानाचा आणि संविधानकर्त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कित्येकवेळा अपमानच केला. स्वतःच्या स्वार्थासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ अमूल्य संविधानामध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे दोन शब्द घुसवणारा पक्ष म्हणजे काँग्रेसच. स्वतःचे पंतप्रधानपद अबाधित राहावे, म्हणून देशात आणीबाणी लादणार्या इंदिरा गांधी या काँग्रेसच्याच ना? ‘राईट टू लिव्ह’ म्हणजे ‘जगण्याचा अधिकार’ हा संविधानाचा आत्मा आहे. जगण्याचा अधिकार या देशातील सर्वांना आहे. त्यात लिंगभेद, जातिभेद, धर्मभेद नाही. मात्र, स्वतःची मतपेटी अबाधित राहावी, म्हणून संविधानातल्या ‘राईट टू लिव्ह’ या सूत्राचा अपमान करत, वयोवृद्ध शाहबानोला मुस्लीम आहे, म्हणून पोटगी नाकारण्याचे काम काँग्रेसच्या पंतप्रधान राजीव गांधी यांच्याच काळातले. पुढे इटलीच्या सोनिया गांधींचे पुत्र राहुल गांधी यांनी, तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा अध्यादेश सार्वजनिकपणे टराटरा फाडला होता. लोकशाहीतून पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या पंतप्रधानांचा अपमान केला होता. त्यामुळे संविधानाचा आणि त्यातील निगडित घटकांचा अपमान करणे, हे गांधी नाव लावणार्या प्रियांका आणि राहुल यांच्या रक्तातच!

यांच्यापासून देश वाचवा!


बिहारमधली एक घटना. गोरी असो की कालीकलुटी, कोणतीही महिला हा फॉर्म भरू शकते. तिला महिन्याला २ हजार, ५०० मिळणार,” तो युवक सांगत होता. या फॉर्ममध्ये महिलांना सर्व तपशीलवार माहिती भरायची होती. अर्थातच, फक्त फॉर्म भरल्यावर महिन्याला २ हजार, ५०० रुपये मिळणार म्हटल्यावर कितीतरी महिलांना हे खरेच वाटले असेल. अनेकजणींना हे खरे वाटलेही नसेल. पण, फॉर्म भरायला आपले काय जाते? मिळाले तर मिळाले पैसे, असे वाटून त्यांनी फॉर्म भरला असेल. युवकाच्या हातातल्या फॉर्मवर राहुल गांधी, प्रियांका गांधी तसेच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम आणि आमदार आनंद शंकर गोरी यांचा फोटो होता. राजकीय नेत्यांचा फोटो पाहून अनेकजणींना वाटले असेल की, हे लोक फॉर्म भरल्यावर आपल्याला पैसे देतील.

पण, हे खरे होते का? फॉर्म भरल्यानंतर महिलांना महिन्याला २ हजार, ५०० रुपये कोण देणार होते? कारण, फॉर्म भरून महिन्याला २ हजार, ५०० मिळवा, अशी काही सरकारी योजनाही बिहारमध्ये नाही. मग फॉर्म भरून महिलांना पैसे देणार होते? राहुल गांधी? प्रियांका गांधी? की, काँग्रेसचे आमदार किंवा पदाधिकारी? अर्थातच, कुणीही नाही. मग तो युवक असे खोटे सांगून का महिलांना भ्रमित करत होता? याचे उत्तर आहे, हा फॉर्म भरून आपली फसवणूक झाली, हे माहितीही न पडलेल्या महिला भोळ्या असणारच, त्यांना राजकारणाचा ओ का ठो माहिती नसणार. मात्र, त्यांना नरेंद्र मोदी माहिती असणार. या महिला अयोध्येतल्या रामललाच्या भक्तही असणार. त्यांच्याच मतावर बिहारमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते. त्यामुळे या महिलांची माहिती घ्यायची. त्यांचे निवडणुकीसाठी मतपरिवर्तन करायचे, त्यांना २ हजार, ५०० रुपये देतो, असे सांगून भ्रमित करायचे आणि काँग्रेसला मतदान करायला लावायचे, असा त्या युवकाचा हेतू असावा असे वाटते. त्यामुळे त्या युवकावर बिहारमध्ये महिलांची माहिती घेण्याबाबत ‘एफआयआर’ दाखल झाला. फक्त त्याच्यावरच नव्हे, तर काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी तसेच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम आणि आमदार आनंद शंकर गोरी यांच्यावरही ‘एफआयआर’ दाखल झाला आहे. कारण, युवक जो फॉर्म भरत होता, त्यावर या काँग्रेसी नेत्यांचे फोटो होते. सत्तेसाठी माता-भगिनींची फसवणूक करणार्यांपासून बिहारच नव्हे, तर देशही वाचायलाच हवा!
Powered By Sangraha 9.0