मुंबई : "आजच्या संघर्षग्रस्त जगाला हिंदू धर्माची गरज आहे. कारण तो एक वैश्विक धर्म आहे, जो विविधता स्वीकारण्यास आणि हाताळण्यास शिकवतो.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. बुधवारी नागपूरमधील 'धर्म जागरण न्यास'च्या नवीन इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक म्हणाले, 'हिंदू धर्म आपल्याला एकता आणि सर्व प्रकारच्या विविधतेचा स्वीकार करण्यास शिकवतो. आपण विविध आहोत, परंतु वेगळे नाही. हा एक असा धर्म आहे जो निसर्गाशी जोडलेला आहे आणि संपूर्ण मानवतेसाठी योग्य आहे. हा हिंदू असला तरी प्रत्यक्षात तो मानवतेचा धर्म आहे. भारतीयांसाठी 'धर्म' म्हणजे केवळ देवाची पूजा करणे नाही तर जगणे आणि सत्य स्वीकारणे आहे.
केवळ राजे-सम्राटच नव्हे तर सामान्य लोकांनीही धर्मासाठी त्याग केल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. ते म्हणाले, "आपला धर्म सत्यावर आधारित आहे आणि जगाचे अंतिम सत्य हे आहे की आपण बाहेरून वेगळे दिसत असलो, तरी अंतर्मनातून एक आहेत. सर्व धार्मिक मार्ग शेवटी एकाच ध्येयाकडे घेऊन जातात, हे हिंदू धर्म आपल्याला शिकवतो. म्हणून कोणीही जबरदस्तीने कोणाचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न करू नये."