महादेवी हत्तीणीसंदर्भातील याचिकेत 'वनतारा'ही सहभागी होणार! मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

06 Aug 2025 12:00:38

मुंबई : (CM Devendra Fadnavis)  कोल्हापूरच्या  नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत सविस्तर चर्चा केली. वनताराशी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी एक्सवर पोस्ट करत याविषयी माहिती दिली. वनतारानेही सकारात्मक भूमिका घेत राज्य सरकारला न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करण्यास तयारी दर्शवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याचिकेत 'वनतारा'ही सहभागी होणार

या चर्चेदरम्यान वनताराने महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. तसेच आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. यावेळी नांदणी मठातील माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, ही जनभावना लक्षात घेऊन राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल. मठानेही आपल्या याचिकेमध्ये राज्य शासनाचाही समावेश करावा. तसेच वन विभागाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात स्वतंत्र सविस्तर भूमिका मांडण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.




Powered By Sangraha 9.0