बदलापूर : (UP ATS arrests doctor from Badlapur) दहशतवादी गुन्हे प्रकरणातील आरोपींना ऑनलाईन मार्गदर्शन केल्याचा ठपका ठेवत, उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) बदलापूरमधून एका डॉक्टरला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. ओसामा म. शेख (२५) असे डॉक्टरचे नाव असून, तो बदलापूर पूर्व येथील एका खासगी रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होता. अटक करण्यात आलेला डॉक्टर ४०० पाकिस्तानी लोकांच्या संपर्कात होता, जे सर्व दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याची माहिती आहे.
बदलापूर शहरात सोमवारी उत्तर प्रदेशमधील दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस उपअधीक्षक सुशील सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथक दाखल झाले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने बदलापूर पूर्वेतील कात्रप रस्त्यावर एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉ. ओसामा शेख याला अटक केली. परिमंडळ-४चे पोलीस उपायुक्त यांच्या मदतीने एटीएसने ही कारवाई केली. दरम्यान, अटकेनंतर त्याला उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता त्याला ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यानंतर एटीएसचे पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले आहे.
उत्तर प्रदेश एटीएसकडून देशविघातक कृत्यांवर नजर ठेवली जात होती. यामध्ये ४०० सदस्य असलेल्या एक पाकिस्तानी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये उत्तर प्रदेशातला एक मोबाईल नंबर समाविष्ट असल्याची माहिती मिळाली. हा नंबर वापरणाऱ्या अजमल अली याला उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतल्याने आपण पाकिस्तानी व्यक्तींच्या संपर्कात असल्याची कबुली दिली. अजमल अलीने इंस्टाग्रामवर एका व्यक्तीला आपला गुरू आणि मेंटॉर मानत असल्याचे सांगितले. अजमलचा गुरू म्हणजेच बदलापूरचा डॉ. ओसामा शेख असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले.
ओसामा हा अजमल अली याच्याप्रमाणे अनेकांशी इंस्टाग्राम आणि इतर अॅपद्वारे संपर्कात राहून देशविरोधी कारवायांना प्रोत्साहन देत होता. हे दोघेही 'रिवाइव्हिंग इस्लाम' नावाच्या सोशल मीडिया ग्रुपशी संबंधित होते. ज्यामध्ये ४०० हून अधिक पाकिस्तानी सदस्य आहेत. या ग्रुपद्वारे गैर-मुस्लिमांविरुद्ध देशविरोधी गोष्टी आणि कट्टरपंथी विचार पसरवण्याचे काम सुरु होते.
दोन्ही आरोपी सोशल मीडियाद्वारे अनेक पाकिस्तानी व्यक्तींच्या संपर्कात होते आणि भारतीय मुस्लिम तरुणांना धर्मभ्रष्ट करण्याच्या उद्देशाने मोठ्या ऑनलाइन नेटवर्कचा भाग होते. एटीएसच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार, त्याचा उद्देश जातीय द्वेष निर्माण करणे, धार्मिक द्वेष निर्माण करणे आणि जिहादद्वारे शरिया कायदा पसरवून गजवा-ए-हिंद या धार्मिक विजयाची इस्लामी संकल्पना स्थापित करण्यासाठी हिंसक चळवळीसाठी जागा तयार करणे हा होता. सध्या एटीएस या संपूर्ण नेटवर्कची सखोल चौकशी करत आहे.