उल्हासनगर : उल्हासनगर गुन्हे शाखेच्या घटक-४ ने अंबरनाथ येथे केलेल्या कारवाईत तब्बल १४ लाख रुपयांचे एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
कारवाईचा तपशील
मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास गुन्हे शाखा घटक-४ चे पोलीस हवालदार राजेंद्र रघुनाथ थोरवे यांना नेवाळी चौकाकडून कटईकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी देवांश ढाब्यासमोर सापळा रचला.
या सापळ्यात नौशिन मैनुद्दीन शेख (वय २५) या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या तपासणीत ७१.०३ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेला आढळला. या जप्त केलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत १४,३१,१२० रुपये आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत नौशिन शेखने हा अंमली पदार्थ इम्रान हबीब खान (वय २६, रा. नालासोपारा) याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी इम्रान खानलाही अटक केली.
या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम ८(c), २०(b) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे करत आहेत.