संघशताब्दीनिमित्त सरसंघचालकांची दिल्लीत तीनदिवसीय व्याख्यानमाला

05 Aug 2025 21:32:39

नवी दिल्ली,  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत येत्या २६ ते २८ ऑगस्टदरम्यान दिल्लीत होणाऱ्या व्याख्यानमालेत संघाचा १०० वर्षांचा प्रवास मांडणार असून नव्या क्षितींजावर भाष्य करणार आहेत, अशी माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी मंगळवारी पत्रकारपरिषदेत दिली आहे.

रा. स्व. संघाच्या शताब्दीनिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी २६ ऑगस्ट रोजी सरसंघचालक संघाची १०० वर्षांचा प्रवास मांडणार असून या यात्रेदरम्यान आलेल्या अनुभवांविषयी ते बोलतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २७ ऑगस्ट रोजी संघ आणि स्वयंसेवकांना भविष्यात कोणत्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, अशा नव्या क्षितीजांवरही सरसंघचालक भाष्य करणार आहेत. व्याख्यानमालेच्या अखेरच्या दिवशी २८ ऑगस्ट रोजी प्रश्नोतरे होणार असून सरसंघचालक यावेळी श्रोत्यांच्या लेखी प्रश्नांना उत्तरे देतील, अशी माहिती अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली.

सरसंघचालक व्याख्यानमालेत पंचवर्तन आणि समाजाचा सहभाग यावरही भाष्य करतील, असे सुनील आंबेकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सध्या देश विकासपथावर असून देशवासियांच्या अनेक आकांक्षा आहेत. त्यामध्ये संघ आणि संघाच्या स्वयंसेवकांच्या योगदानावरही चर्चा होईल. भारताला नवीन क्षितिजांकडे पुढे जायचे असेल तर तो केवळ स्वतःच्या ताकदीने आणि शौर्याने पुढे जाऊ शकतो, यावर सरसंघचालक विशेष भर देणार आहेत. १०० वर्षांच्या प्रवासात, संघाने नेहमीच समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याचा आणि संघाची विचारसरणी वेगळी नसून भारताच्या स्थापित परंपरेवर आधारित आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. संघाची विचारसरणी सर्वांसह देशाला पुढे नेण्यात योगदान देण्याची आहे आणि विकासाच्या या प्रवासात संपूर्ण देशाने एकत्र पुढे जावे अशी आमची इच्छा आहे, असेही सुनील आंबेकर यांनी नमूद केले.

संघशताब्दीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी १ हजारांहून अधिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ज्यामध्ये संघाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळेदेखील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. सरसंघचालकांच्या व्याख्यानमालांचे आयोजन नोव्हेंबरमध्ये बंगळुरू कोलकाता तर फेब्रुवारीमध्ये मुंबईत करण्यात येणार आहे.

विविध क्षेत्रातील प्रमुख मंडळींना निमंत्रण


विज्ञान भवन येथे होणाऱ्या या तीन दिवसांच्या व्याख्यानमालेत समाजाच्या सर्व स्तरातील, वर्गातील आणि विचारसरणीतील मान्यवर उपस्थित राहतील. यासाठी, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक, क्रीडा, शिक्षण, ज्ञान परंपरा आणि भाषा, उद्योजक आणि भारतात स्थित विविध देशांचे राजदूत अशा १७ मुख्य आणि १३८ सह-श्रेणींमध्ये सर्व स्तरातील मान्यवरांना आमंत्रित केले जात आहे.

भारतीयत्व हेच भविष्य


गुलामगिरीच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या विकासाच्या वसाहतवादी मापदंडांवरही व्याख्यानमालेत चर्चा होणार आहे. आतापर्यंत दडपलेल्या भारतीय समाजाच्या अमर्याद क्षमता बाहेर आणण्यासाठी विचार मांडले जातील. यासोबतच, भारताच्या जागतिक भूमिकेसह सध्याच्या काळात देश आणि समाजासाठी महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होईल.
Powered By Sangraha 9.0