‘खालिद का शिवाजी’- खोटा ‘नॅरेटिव्ह’ हाणून पाडण्याची गरज!

05 Aug 2025 22:06:56

महाराष्ट्रात आता ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सदर चित्रपटात ‘शिवरायांच्या सैन्यात ३५ टक्के मुस्लीम होते, शिवरायांनी रायगडावर मशीद बांधली होती, शिवरायांचे ११ अंगरक्षक मुस्लीम होते,’ असे ‘खोटे नॅरेटिव्ह’ प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीसुद्धा गेल्या दोन-तीन दशकांपासून अनेक विचारवंत आणि सेयुलर पोंगापंडितांनी असाच बिनबुडाचा इतिहास प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. परंतु, या तथाकथित विचारवंतांनी तेव्हा आणि आजही याबाबतचा कोणताही समकालीन पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे शिवरायांच्या सैन्यातील कथित मुस्लीम सैन्यावर भाष्य करून चर्चा आवश्यक ठरते.

महाराष्ट्रात गेल्या तीन दशकांपासून शिवकालीन इतिहासाची मोडतोड करून विकृतीकरण सुरू आहे. महाराष्ट्रामधील काही बाजारू विचारवंत तथा स्वयंघोषित विचारवंत मंडळी समाजात धादांत खोट्या शिवकालीन इतिहासाची मांडणी करीत आहेत. शिवजयंती उत्सव आणि इतर उत्सवांमध्ये खोटा इतिहास ‘प्रबोधना’च्या गोंडस नावाखाली समाजात शिवकालीन खोटा इतिहास मांडण्याचा अजेंडा पद्धतशीर राबवित आहेत. ‘शिवरायांच्या सेनापतीपासून वकील मुस्लीम होते,’ ‘स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर शिवरायांनी मुस्लिमांसाठी मशीद बांधली होती. त्यांनी कुराणसुद्धा वाचले होते’ वगैरे वगैरे. बाबा याकूत यांना शिवरायांच्या गुरूस्थानी बसविण्याचा अट्टाहास करणारे भाष्य अनेक वेळा केले आहेत. तसेच ‘धर्माध औरंगजेब क्रूर नव्हता. औरंगजेब, अफजलखान होता म्हणून शिवराय आहेत,’ अशी चुकीची आणि तर्कसंगत नसलेली भन्नाट वक्तव्येसुद्धा केली गेली आहेत. आतासुद्धा ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटात शिवरायांच्या सैन्यात प्रचंड मुस्लीम सैन्य होते, हा सर्वांत खोटा दिशाभूल करणारा इतिहास ठासून सांगितला गेला. त्यामुळेच ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटातील वादग्रस्त सादरीकरणावर शासनाने गांभीर्याने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. तसेच, शिवरायांच्या सैन्यातील कथित मुस्लीम सैन्यावर खुली चर्चा करण्याची आवश्यकता आहे.

शिवरायांच्या सैन्यातील मुस्लीम प्रमाण तर्कसंगत आहे?

शिवरायांच्या सैन्यात घोडदळ व पायदळामध्ये मुस्लिमांची प्रचंड मोठी संख्या व शिवरायांचे सेनापती व इतर सहकारी मुस्लीम असल्याचा ‘खोटा नॅरेटिव्ह’ काही बाजारू विचारवंतांच्या टोळ्या समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ते असे का करीत आहेत किंवा कशासाठी करीत आहेत, हे लक्षात येत नाही. हे एक पद्धतशीर षड्यंत्र असल्याचे मात्र स्पष्टपणे लक्षात येते. देशातील विविध भागांतसुद्धा हा ‘नॅरेटिव्ह’ मांडला जात आहे. ओवेसीपासून गल्लीबोळातील गावठी स्वयंघोषित इतिहासतज्ज्ञ समाजात खोटा इतिहास प्रस्थापित करण्याचा करीत आहेत.

महाराष्ट्रातील शिवकालीन इतिहास हा आपला गौरवशाली इतिहास असून, तो रक्ताने लिहिलेला इतिहास आहे. त्याची मोडतोड किंवा विकृतीकरण कदापि होऊ नये. पण, ठरवून काही बाजारू विचारवंत व नकली इतिहासकारांच्या टोळ्या खुशाल शिवकालीन इतिहासाची मोडतोड करून चुकीचा व दिशाभूल करणारा खोटा इतिहास समाजात प्रस्तुत करीत आहेत.

‘शिवरायांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात मुस्लीम सैनिक होते,’ असा त्यांचा नेहमीचाच अजेंडा. पण, हे सिद्ध करण्यासाठी कोणताही ऐतिहासिक पुरावा न मांडता, कपोलकल्पित खोटा व निराधार इतिहास ही मंडळी मांडत असतात. पहिली ही संख्या ४०० सांगण्यात आली. नंतर हीच संख्या ७०० इतकी झाली. आता हळूहळू मुस्लीम सैन्यसंख्या वाढतच आहे. ज्याप्रमाणे शिवरायांच्या सैन्यातील मुस्लीम सैन्यसंख्या वाढली, त्याचप्रमाणे श्री शिवराज्याभिषेक चित्रामध्ये देखील मुस्लीमसंख्या वाढत आहे. कोणी म्हणतात, शिवरायांच्या सैन्यात ५० टक्के सैन्य मुस्लीम होते, तर कोणी ५७ टक्के मुस्लीम घोडदळ सैनिक असल्याचे सांगून आश्चर्यजनक दावे करतात. आतासुद्धा ‘खालिद का शिवाजी’मध्ये तोच खोटा इतिहास प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.

वास्तविक, शिवरायांच्या सैन्यात जवळपास पायदळ सैन्यसंख्या एक लक्ष होती, तर एक लक्ष, पाच हजार घोडदळ सैन्य होते. घोडदळाचे ‘बारगीर’ व ‘शिलेदार’ असे दोन विभाग होते. ज्याचे स्वतःचे घोडे असत, त्यास ‘शिलेदार’ व ज्याला स्वराज्यामधून घोडे मिळत, त्यास ‘बारगीर’ म्हणत. ४५ हजार बारगीर व ६० हजार शिलेदार घोडेस्वार होते. शिवरायांच्या सैन्यात पायदळ व घोडदळ, तसेच २८० गडकोटावरील प्रशासनामधील हवालदार, किल्लेदार, सबनीस, कारखानीस इतर कारागीर यांची एकूण संख्या जवळपास दोन लक्ष, ५० हजार होती. त्यांना स्वराज्यामधून वेतनसुद्धा मिळत असे. त्यामुळे ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटामधून शिवरायांच्या सैन्यातील व घोडदळमधील मुस्लीम प्रमाण सांगून शिवभक्तांची किती मोठी दिशाभूल करीत असल्याचे लक्षात येते.

वास्तविक, शिवरायांच्या सैन्यात केवळ बोटावर मोजण्याइतकेच मुस्लीम सैनिक होते. कोणताही बखरी किंवा इतिहास तपासला, तर हेच सत्य बाहेर येईल. पण, शिवरायांना ‘धर्मनिरपेक्ष’ ठरविण्यासाठी किंवा कोणाला तरी खूश करण्यासाठी हा कांगावा केला जात आहे का? खरोखरच शिवरायांच्या सैन्यात ५० टक्के किंवा ५७ टक्के मुस्लीम सैनिक असते, तर त्यांचे वारसदार कुठे गेले आहेत? मग त्यांचे वारसदार शोधून का काढत नाहीत? त्यामुळेच अशा निराधार, खोट्या इतिहासावर चर्चा होणे आवश्यक आहे व निरपेक्ष सत्य इतिहासासमोर येणेसुद्धा आवश्यक आहे.

मुस्लीम सैन्याचे वारसदार कुठे गेले?

शिवजयंती उत्सव, शिवराज्याभिषेक दिन किंवा इतर व्याख्यानमालांमध्ये प्रबोधनाच्या बुरख्याआडून किंवा प्रबोधनाच्या गोंडस नावाखाली काही स्वयंघोषित इतिहासतज्ज्ञ शिवकालीन इतिहासाचे विकृतीकरण करतात. ‘शिवरायांच्या सैन्यात प्रचंड मुस्लीम होते,’ असा अजेंडासुद्धा राबविला जातो. अनेक आश्चर्यचकित करणारे निराधार, खोटे कांगावे सादर करून शिवभक्तांची दिशाभूल केली. पण, शिवरायांच्या मुस्लीम सैन्याचे वारसदार कुठे गेले, हे कुणीही सांगत नाहीत. शिवरायांच्या सैन्यातील सैन्य व सरदार घराणे आजही महाराष्ट्राच्या राजकारण ते समाजसेवेच्या विविध कार्यक्षेत्रांमध्ये कार्यरत राहून, समाजसेवा करीत आहेत. मग शिवरायांच्या सैन्यात प्रचंड प्रमाणात असलेल्या मुस्लीम सैन्याचे वारसदार किंवा घराणे समोर का येत नाहीत? याचा अर्थ इतिहास संशोधक गजानन मेहंदळे यांनी संशोधन केल्याप्रमाणे, शिवरायांच्या सैन्यात बोटावर मोजण्याइतके मुस्लीम सैनिक होते. अफजलखानाचा कोथळा काढला, तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या सिद्दी इब्राहिम यांच्यासारख्यांचे योगदान कोणीही अमान्य करीत नाहीत. त्यामुळे ‘नकली इतिहास’ का सांगितला जातो? महाराष्ट्रात दोन दशकांपासून जो काही कांगावा सुरू आहे, तो बंद करण्याची नितांत आवश्यकता आहे. मुस्लीम सैन्याचा इतिहास हिंदू का सांगत आहेत? ‘शिवरायांच्या सैन्यात प्रचंड प्रमाणात मुस्लीम सैन्य होते’ आणि मुस्लीम सैन्याच्या प्रमाणाचा इतिहास हा कोणताही मुस्लीम महाराष्ट्रात सांगत नाही किंवा उल्लेखही करीत नाही. मग खोटा इतिहास सांगणारे कोण आहेत? तर खोटा इतिहास सांगणारे सर्व हिंदू असून, यामध्ये काही आमदारही आघाडीवर आहेत आणि खोटा इतिहास सांगण्याची त्यांच्यामध्ये स्पर्धासुद्धा लागली आहे. उस्मान शेख व सुभान अली यांच्याव्यतिरिक्त हा इतिहास मुस्लीम विचारवंत का सांगत नाहीत? तसेच, शिवरायांच्या सैन्यातील मुस्लीम सहभागाचा इतिहास मुस्लीम समाजाला मान्य आहे का? हा प्रश्न किंवा मुद्दा ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या निमित्ताने चर्चिला जाणे आवश्यक आहे.
बाजारू विचारवंतांच्या मुसया आवळा!

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान आहे. ते कोण्याही एका जातीपातीचे नाहीत किंवा त्यांच्यावर कोणत्याही एका विशिष्ट समाज किंवा राजकीय पक्ष यांची मक्तेदारी किंवा ठेकेदारीसुद्धा नाही. त्यामुळेच शिवकालीन इतिहासाचे ‘खोटे नॅरेटिव्ह’ सादर करून विकृतीकरण होऊ नये आणि तसे होत असेल, तर असे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे. चित्रपट व प्रबोधनाच्या गोंडस नावाखाली जी दिशाभूल करण्याचा जो प्रकार सुरू आहे, तो बंद पाडला पाहिजे. सोबतच जे बाजारू विचारवंत खोटा इतिहास प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांचा बंदोबस्त करून समाजाने पुढाकार घेऊन त्यांच्या मुसया आवळल्या पाहिजे.

‘खालिद का शिवाजी’ चित्रपटात शिवरायांच्या सैन्यातील कथित मुस्लीम सैन्यावर जे वादग्रस्त भाष्य केलेले आहे, त्याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. समाजात विचारमंथन आणि खुली चर्चा करण्यासाठी समाजानेच पुढे येऊन सत्यता समोर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी शिवरायांच्या सैन्यातील कथित मुस्लीम सैन्यावर खुली चर्चा होऊन सत्य इतिहास समोर आला, तरच शिवकालीन इतिहासाचे खोटे सादरीकरण आणि विकृतीकरणाचे षड्यंत्र थांबेल, असे म्हणण्यास हरकत नाही.
Powered By Sangraha 9.0