मुंबई : मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयाने नुकताच दिला. एका साध्वीच्या, काही संन्याशांच्या, एका लष्करी अधिकार्याच्या व काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या समर्पित जीवनाला लागलेला बट्टा दूर झाला. हे एक सुनियोजित षड्यंत्र होते का? असा प्रश्न आधी पडला होता. मात्र आता साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वकील वरिष्ठ अधिवक्ता ॲड. जयप्रकाश मिश्रा यांनी दै. मुंबई तरुण भारतला दिलेल्या मुलाखतीतून हे सिद्ध झाले, की हे एक सुनियोजित षड्यंत्रच होते. जयप्रकाश मिश्रा यांनी तत्कालिन एटीएसची भूमिका, काँग्रेस सरकारचा असलेला दबाव, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्यावर झालेले अनन्वित अत्याच्यार, इ. आणि असे अनेक धक्कादायक खुलासे आपल्या मुलाखतीतून केले आहेत.
जयप्रकाश मिश्रा यांनी तत्कालिन काँग्रेस सरकारवर आरोप केले की, काँग्रेस सरकारने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निष्पाप हिंदूंना फसवण्याचे महाभयंकर पाप केले. २००८ दरम्यान राज्यात ज्या-ज्या ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या, तिथे विशिष्ट धर्माचे लोकच आरोपी म्हणून पकडले जात होते. अशातच २००९ मध्ये लोकसभा निवडणून येऊ घातली होती. त्यामुळे त्या विशिष्ट धर्माची असलेली नाराजी दूर करून त्यांना खूश करण्यासाठी खोटे षडयंत्र रचून हिंदूंना पकडले. सरकारला एकाअर्थी असे दाखवायचे होते की, हिंदू पण आतंकवादी आहेत. त्यानंतर जयपूरच्या अधिवेशनापासून काँग्रेसचे सुशिलकुमार शिंदे, दिग्विजय सिंह, पी.चिदंबरम आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी 'भगवा दहशतवाद' ही थेअरी रेटायला सुरुवात केली.
ॲड. जयप्रकाश मिश्रा यांनी गेली १७ वर्षे मालेगाव बॉम्बस्फोट सारख्या एका अत्यंत कठीण, विवादग्रस्त आणि राजकीय रंग दिलेल्या प्रकरणात केवळ सत्यासाठी, न्यायासाठी आणि निर्दोषांना वाचवण्यासाठी अखंडपणे लढा दिला. अनेक सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक दबाव झेलत अन्यायाच्या अंधारात अडकवलेल्या निर्दोष हिंदू युवकांसाठी त्यांनी आपले आयुष्यच समर्पित केले होते. अखेर १७ वर्षांनंतर त्याच तपश्चर्येचे फळ मिळाले आणि काँग्रेसने लावलेला "भगवा दहशतवाद" हा कलंक इतिहासजमा झाला.
मोटरसायकलचे गौडबंगाल!
हे खरे आहे की, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याकडे एलएमएल कंपनीची फ्रिडम मोटरसायकल होती. मात्र आपल्या उंचीपेक्षी आकाराने ती थोडी मोठी असल्याने त्यांना त्यावर बसणे कठीण जायचे. त्यामुळे साध्वींनी २००४ मध्येच इंदौरच्या एका व्यक्तीला ती विकून टाकली होती. ज्यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचे षडयंत्र रचले, त्यांनी हा मुद्दा धरून त्याठिकाणी एलएमएल कंपनीच्या फ्रिडम मोटरसायकलला स्फोटके लावून स्फोट घडवून आणला. महत्त्वाचे म्हणजे, तपासात ती मोटरसायकल साध्वींची नाही, हे कळू नये म्हणून त्या गाडीचा 'चेसीस व इंजिन नंबर' खोडले होते. त्यामुळे गाडीचा खरा मालक शोधण्याचे तेव्हा आव्हान होते, असे जयप्रकाश मिश्रा यांनी सांगितले. ज्यामध्ये त्यांनी पुढे काहीप्रमाणात यशही आले.
साध्वींची अवैध कस्टडी व अमानुष मारहाण
एटीएस अधिकारी अरविंद सावंत यांनी दि. ७ ऑक्टोबर २००८ रोजी साध्वींना निरोप दिला की, 'तुमच्या मोटरसायकलमुळे एक अपघात झाला आहे, त्याप्रकरणी तुम्हाला मुंबईला यावे लागेल.' साध्वींनी पोलिसांना सहकार्य करत १० ऑक्टोबर २००८ रोजी सूरतला पोहोचल्या. त्याचदिवशी त्यांना मुंबईला आणण्यात आले आणि १० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २००८ पर्यंत अवैधरित्या एटीएसच्या कस्टडीत ठेवले. बॉम्बस्फोट त्यांनीच घडवून आणला आणि तो डॉ. मोहनजी भागवत, नरेंद्र मोदी, इन्द्रेश कुमार व योगी आदित्यनाथ यांच्या सांगण्यावरून घडवला, हे त्यांच्या तोंडून वदवण्याचा प्रयत्न सुरु झाला. चांबड्याच्या पट्ट्याने अमानुष मारहाण व्हायला लागली. हात सुजले की, मीठाच्या पाण्यात बुडवून सूज उतरल्यावर परत माराहाण व्हायची. अगदी विवस्त्र करून मारल्याचे साध्वींचे वकील जयप्रकाश मिश्रा यांनी सांगितले आहे. 'भगवा आतंकवाद' सिद्ध करण्यासाठी हे सर्व सुरु होते. धक्कादायक म्हणजे त्यांना आळीपाळीने मारणाऱ्यांमध्ये एका महिला पोलीस अधिकारीसह हेमंत करकरे, परमवीर सिंह आणि इतर पुरुष पोलीस अधिकाऱ्यांचेही हात होते, असे जयप्रकाश मिश्रा यांनी साध्वींनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार म्हटले आहे.
मकोका व यूएपीए लावण्याचे प्रयत्न
अॅड. जयप्रकाश मिश्रा म्हणाले की, बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींविरोधात मकोका लावण्यचा देखील प्रयत्न तेव्हा झाला. वास्तविक मकोका लावण्यासाठी आरोपीविरोधात किमान दोन चार्जशिट असाव्या लागतात. १२ जणांपैकी एक असलेले पुण्याचे राकेश धावडे यांना जेव्हा २ नोव्हेंबर २००८ रोजी अटक झाली तेव्हा केवळ मकोका लावायच्या उद्देशाने त्यांच्याविरोधात परभणीची केस (११ नोव्हेंबर) व जालना केस (१५ नोव्हेंबर) अंतर्गट चार्जशीट फाईल केली. मात्र अटक करण्यापूर्वी जर दोन चार्जशीट फाईल असतील तरच मकोका लागू शकतो, आणि राकेश धावडे विरोधात अटकेनंतर मकोका लावण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे केवळ मकोका लावण्याच्या उद्देशाने चार्जशीट फाईल केल्याचे तेव्हा सिद्ध झाले होते. इतकेच नव्हे तर त्यापलीकडे जाऊन यूएपीए लावण्याचाही प्रयत्न झाला. मात्र ते देखील कायद्याला धरून नसल्याने ते शक्य झाले नाही.
साध्वींची दोनवेळा अवैधरित्या 'नार्कोटेस्ट'
अटकेनंतरच्या काळात झालेल्या अमानुष मारहाणीमुळे साध्वींची हालत गंभीर झाली होती. त्यांना आधी दादरच्या सुश्रुषा व नंतर वझे या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून जेव्हा त्यांना डिस्चार्ज मिळाला त्यांनतर त्यांची नार्कोटेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट, पॉलिग्राफी, सायकोलॉजिकल टेस्ट करण्यात आली. त्या देखील एकदा न्यायालयाच्या परवानगीने व दोन अवैधरित्या करण्यात आल्या. इतके करून सुद्धा साध्वींच्या विरोधात पुरावा मिळाला नाही म्हणून एटीएसने तो रिपोर्ट न्यायालयात सादरच केला नाही, असे स्वतः साध्वींनी म्हटल्याचे जयप्रकाश मिश्रा यांनी सांगितले.
कसाबला जिवंत पकडले नसते तर?
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी पाकिस्तानचा अजमल कसाब याला जिवंत पकडले नसते, तर मालेगाव बॉम्बस्फोटाचे षडयंत्र रचणाऱ्यांनी तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूचे खापर रा.स्व.संघावरच फोडले असते, असा धक्कादायक खुलासा मिश्रांनी मुलाखतीतून केलाय. त्यांनी आणखीन एक माहिती सांगितली, जी एटीएसचे माजी अधिकारी महबूब मुजावर यांच्याशी संबंधित होती. त्यांनी न्यायालयासमोर सांगितले होते की, एटीएसने ज्यांना फरार म्हणून घोषित केले, त्यांना एटीएसच्याच अधिकाऱ्यांनी मारले. ज्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट २६/११ च्या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये लावून टाकण्यात आली.