शायना एनसी यांची 'शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ते'पदी नियुक्ती!

    05-Aug-2025   
Total Views |

मुंबई : (Shiv Sena appoints Shaina NC as National Spokesperson of Party) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शायना एनसी यांची 'शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ते'पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत नियुक्ती पत्राद्वारे घोषणा करण्यात आली आहे. या पत्रावर पक्षाचे सचिव संजय मोरे यांची स्वाक्षरी आहे. यानुसार, शायना यांचा हा कार्यकाळ एक वर्षाचा असेल.


नियुक्ती पत्रात म्हटल्याप्रमाणे, "शायना एन. सी. या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा सक्रिय प्रचार-प्रसार करतील, तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक वाढीसाठी एकजूट करून कार्य करतील, असा पक्षाला विश्वास आहे. पक्षाच्या ध्येय-धोरणांची ठामपणे मांडणी करण्यासाठी शायना एन. सी. यांची भूमिका महत्त्वाची ठरेल."

शायना एनसी यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महानगरातील मुंबादेवी मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला होता. मात्र, आता त्यांच्यावर शिवसेनेने ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या नियुक्त्या आणि पक्षांतरं होत आहेत. त्यातच शायना एन.सी. यांची ही नियुक्ती ४ ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे.

शायना एन.सी. कोण आहेत?

शायना एन.सी. यांचे पूर्ण नाव शायना नाना चुडासमा असे आहे. त्यांचे वडील नाना चुडासामा हे मुंबईचे 'नगरपाल' (शेरीफ) होते. आय लव्ह मुंबई, आणि फोरम अगेन्स्ट ड्रग्ज अँड एडस् या संघटनांचे ते संस्थापक अध्यक्ष होते. शायना या नावाजलेल्या फॅशन डिझायनर असून काही वर्षांपूर्वी त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. त्यासोबतच त्या सामाजिक कार्यात सक्रिय झाल्या. त्या अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी स्त्रियांसाठी आणि गरजूंसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. शायना एनसी यांना भारतीय फॅशन उद्योगात 'क्वीन ऑफ ड्रेप्स' म्हणून ओळखले जाते.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\