मुंबई : केरळमध्ये ३१ वर्षांपूर्वी राज्यसभा खासदार सी. सदानंदन मास्टर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या ८ सीपीएम कार्यकर्त्यांनी कुन्नूर न्यायालयात आत्मसमर्पण केले. सोमवारी न्यायालयात जाण्यापूर्वी सीपीएम नेत्यांनी या सर्वांसाठी विशेष निरोप समारंभ आयोजित केला होता. विशेष म्हणजे या निरोप समारंभाला केरळच्या माजी शिक्षणमंत्री के. के. शैलजा या देखील उपस्थित होत्या.
या निरोप समारंभामुळे कम्युनिस्ट पक्षावर जोरदार टीका होताना दिसत आहेत. या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये स्पष्टपणे दिसते आहे की, पक्षाचे नेते हल्लेखोरांच्या समर्थनार्थ घोषणा देत निरोप देत आहे. वास्तविक या हल्लेखोरांना १९९७ मध्येच ट्रायल कोर्टाने दोषी ठरवले होते; मात्र ते गेल्या सात महिन्यांपासून फरार होते. उच्च न्यायालयाने म्हटले की दोषींनी केलेले घृणास्पद कृत्य कोणत्याही प्रकारची दया दाखविण्यास पात्र नाही. हा हल्ला अचानक घडला नव्हता. तो पूर्वनियोजित होता. न्यायालयाने असेही म्हटले की दोषींना कोणतीही सवलत मिळू नये.
उच्च न्यायालयाने भरपाईची रक्कमही वाढवली आहे. आता प्रत्येक दोषीला ५०,००० रुपये द्यावे लागतील. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, दोषींनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले, परंतु तेथे याचिका फेटाळण्यात आली. यानंतर, उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला आणि त्यांना ४ ऑगस्टपर्यंत न्यायालयात शरण येण्याचे आदेश दिले. सोमवारी, दोषी ठरलेले सर्व आठ सीपीएम कार्यकर्ते थलासेरी येथील सत्र न्यायालयात हजर झाले जिथून त्यांना कन्नूर मध्यवर्ती तुरुंगात पाठवण्यात आले.
हा सन्मान समारंभ थालसेरी सेशन्स कोर्टाच्या बाहेर आणि कन्नूर जिल्ह्यातील मत्तनूर येथे आयोजित केला होता. हे तेच ठिकाण आहे जिथे सदानंदन मास्टर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.