नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ हा भारतीय सैन्याचा सन्मान आणि पराक्रम असून तो देशासमोर मांडणे हे कर्तव्य आहे. त्याचवेळी त्यावर संसदेत चर्चेची मागणी करून विरोधी पक्षांनी ‘सेल्फगोल’ केला असून त्याचा आता त्यांना पश्चाताप होत आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लगावला आहे.
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (रालोआ) संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रालोआच्या लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले, भारतीय सैन्याने आपल्या पराक्रमाने शत्रूला धूळ चारली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा भारतीय सैन्याचा सन्मान आणि पराक्रम असून तो देशासमोर मांडणे हे कर्तव्य ठरते. विरोधी पक्षांनीही त्यावर संसदेत चर्चेची मागणी केली होती. मात्र, आता ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा झाल्यानंतर विरोधकांना आपण ‘सेल्फगोल’ केल्याची जाणीव झाली असून आता त्यांना पश्चाताप होत आहे. आपल्याच पायांवर कुऱ्हाड मारून घेणारा विरोध पक्ष जगात कोठेही नसेल. अशा प्रकारच्या चर्चांची मागणी विरोधकांनी वारंवार करावी, जेणेकरून आपल्याला सत्य सांगण्याची संधी मिळेल; असे पंतप्रधानांनी म्हटले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नाव घेता पंतप्रधानांनी त्यांना टोला लगावला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, विरोधी पक्षाचे नेते काहीही बोलतात आणि त्यामुळेच त्यांना आता सर्वोच्च न्यायालयाने फटकारले जात आहे. काल (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या झटक्य़ापेक्षा मोठी शिक्षा असू शकत नाही, असाही घणाघात यावेळी त्यांनी केला.
रालोआ संसदीय पक्षाच्या बैठकीत 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात एक ठराव मंजूर करण्यात आला. रालोआसंसदीय पक्षाने 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'ऑपरेशन महादेव' दरम्यान भारतीय सैन्याने दाखवलेल्या धाडसाला वंदन केले. यासोबतच पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरम्यान, भाजप आणि रालोआ घटकपक्षांतर्फे पंतप्रधान मोदी यांचेही अभिनंदन करण्यात आले.