
मुंबई : मुंबईच्या मेट्रो प्रवासाने एक मोठा टप्पा गाठत मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांवर केवळ ३९ महिन्यांत एकूण २० कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. कार्यालयीन कर्मचारी वाहतुकीच्या कोंडीतून मुक्त व्हावेत, विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित व वातानुकूलित प्रवास मिळावा, यासाठी मेट्रोने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उपनगरांना जोडणारी, रस्त्यांवरील वाहतूक कमी करणारी आणि प्रवासाचा वेळ निम्म्याहून अधिक कमी करणारी ही व्यवस्था मुंबईकरांसाठी खरंच जीवनवाहिनी ठरली आहे.
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एमएमएमओसीएल) व्यवस्थापकीय संचालिका रुबल अग्रवाल म्हणाल्या, "हा टप्पा गाठणे म्हणजे उत्कृष्ट समन्वय, समर्पित टीम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबईकरांच्या विश्वासाचे फलित आहे. आमच्या ऑपरेशन्स टीम्स २४x७ काम करत असून, प्रवासाची सुरक्षितता, कार्यक्षमता आणि स्वच्छता टिकवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. पुढील टप्प्यात आम्ही सेवा वारंवारता वाढवत आहोत, डिजिटल तिकीट प्रणाली अधिक सक्षम करत आहोत आणि लास्ट-माइल कनेक्टिव्हिटी अधिक बळकट करत आहोत."
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, "दर महिन्याला ४ ते ५ टक्के दराने वाढणारी प्रवासीसंख्या हेच दाखवते की मुंबईकर आता अधिक स्मार्ट आणि शाश्वत प्रवासाच्या पर्यायांकडे वळत आहेत. हे उल्लेखनीय यश त्या प्रत्येक नागरिकामुळे शक्य झाले आहे, ज्याने मेट्रोवर विश्वास ठेवत आपला प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि पर्यावरणस्नेही करण्याची निवड केली. आपण सर्वजण मिळून भविष्याच्या दृष्टीने सक्षम अशी मुंबई उभारत आहोत."
महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे
२ एप्रिल, २०२२ : एका दिवसात १९,४५१ प्रवाशांचा मेट्रो प्रवास
२७ जानेवारी, २०२३ : एकूण प्रवासीसंख्या १ कोटी
२८ मे, २०२४ : एकूण प्रवासीसंख्या १० कोटी
४ जानेवारी, २०२५ : एकूण प्रवासीसंख्या १५ कोटी
८ जुलै, २०२५ : एका दिवसात ३ लाखांहून अधिक प्रवासी
ऑगस्ट, २०२५ : एकूण प्रवासीसंख्या २० कोटींच्या पुढे
"महाराष्ट्राच्या विकासाचा कणा म्हणजे पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्था ही जीवनवाहिनी आहे. २० कोटी प्रवाशांचा टप्पा गाठला जाणे, यातून मुंबईकरांचा मेट्रोवरील विश्वास दिसून येतो. या महानगरातील प्रत्येक भागात अधिक सुविधा, अधिक जोडणी आणि अधिक स्वच्छ हवा उपलब्ध करून देण्यासाठी हे नेटवर्क विस्तारण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे."
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
"महा मुंबई मेट्रोचा यशस्वी प्रवास हे वेळेत अंमलबजावणी आणि लोककेंद्री नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे. हे केवळ वाहतूक व्यवस्थेचे यश नसून, नागरिकांच्या जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे. प्रत्येक मेट्रो प्रवासासोबत आपण एका अशा मुंबईकडे वाटचाल करत आहोत, जिथे सर्व घटक जोडले जातील आणि कुणीही मागे राहणार नाही."
- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, एमएमआरडीए अध्यक्ष