मुंबई : सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षनेत्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याची वेळ येते, इतका अपरिपक्व विरोधी पक्षनेता आज भारताच्या लोकसभेत आहे, हे खरे तर या देशाचे दुर्दैव आहे, अशा शब्दात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "चीनने भारताचा भूभाग बळकावला, असा असा अपप्रचार करून देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात फटकारले आहे. भारताची आणि भारतीय सैन्याची बदनामी करणारे राहुल गांधींचे वक्तव्य अक्षम्य आणि देशविरोधी आहे. राहुल गांधींनी केलेल्या या देशविरोधी वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज खुलासा मागितला. तसेच, तुम्ही जर खरे भारतीय असता, तर असे वक्तव्य केलेच नसते, अशा कठोर शब्दात सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या या मताशी आज प्रत्येक भारतीय सहमत आहे."
"आपल्या स्वार्थी राजकारणापायी भारतीय सैन्याचे मनोबल खचेल आणि शत्रू राष्ट्राला त्याचा लाभ होईल अशी सवंग वक्तव्य करणे, हा केवळ गुन्हा नाही तर ते पाप आहे. हे पाप या देशात कुणीही करू नये. आज सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना त्यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीची देखील जाणीव करून दिली. सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षनेत्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्याची वेळ येते, इतका अपरिपक्व विरोधी पक्षनेता आज भारताच्या लोकसभेत आहे, हे खरे तर या देशाचे दुर्दैव आहे," असे ते म्हणाले.
राहुल गांधींनी बोध घ्यावा
"राहुल गांधींनी किमान यातून तरी काहीतरी बोध घ्यावा आणि अशी अशोभनीय, सवंग आणि संतापजनक वक्तव्ये करणे थांबवावे. आपल्या अशाच वर्तनामुळे संपूर्ण देशाने आपणास आणि काँग्रेसला नाकारले आहे. राहुलजी, आपण आज ज्या पदावर आहात त्या पदावर अनेक महान व्यक्तिमत्व बसलेली आहेत. त्या पदाची उंची वाढवणे सोडा पण किमान अपमान होणार नाही याची तरी काळजी आपण घ्यावी. किमान आता तरी राहुल गांधींनी आपले घाणेरडे राजकारण बाजूला ठेवून देशहिताला प्राधान्य द्यावे. अन्यथा, या देशातील जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.