मुंबई, सार्वजनिक शौचालयांमधील स्वच्छतेची कमतरता, तसेच उपलब्ध शौचालये आणि लोकसंख्येचे व्यस्त प्रमाण यामुळे धारावीकर ई-कोलाई या गंभीर विषाणूच्या संसर्गाच्या सावटाखाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बहुतांशी वस्तीतील अस्वच्छ शौचकुपे (टॉयलेट सीट), पाण्याची कमतरता, स्वच्छतेसाठी साबण किंवा इतर बाबींचा अभाव यामुळे ई- कोलाई विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असून स्थानिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. अतिसार (डायरिया) समजून स्थानिकांकडून दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या या विषाणू संसर्गाने धारावीत पोटाच्या विकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.
सार्वजनिक शौचालयांच्या गंभीर समस्येबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. "स्वच्छ शौचालय हा प्रत्येक स्त्री चा मूलभूत अधिकार आहे. दुर्दैवाने धारावीसारख्या ठिकाणी स्त्रियांना हा मूलभूत अधिकारही मिळत नाही. अस्वच्छता आणि शौचालयाच्या वेळेचे बंधन यामुळे बऱ्याचदा स्त्रियांची मानसिक व शारीरिक कुचंबणा होते. अस्वच्छतेमुळे विषाणूंचा प्रसार होऊन पोटाच्या विकारांना आमंत्रण मिळते. तसेच स्वच्छ शौचालयांच्या अभावी, मासिक पाळीच्या काळातही धारावीतील स्त्रियांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते, ही खेदाची बाब आहे" अशी प्रतिक्रिया नाव न सांगण्याच्या अटीवर या अधिकाऱ्याने दिली.
मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील परिस्थितीबाबत 'प्रजा फाऊंडेशन' या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातही सार्वजनिक शौचालयांच्या समस्येवर बोट ठेवण्यात आले आहे. या संस्थेच्या २०२५मधील अहवालानुसार, शौचकूप (टॉयलेट सीट) आणि लोकसंख्या यांच्यातील व्यस्त प्रमाणाची आकडेवारी अधोरेखित केली आहे. धारावीत सुमारे ७०% स्थानिक सार्वजनिक शौचालयांचा वापर करतात.
वास्तविक, १० वर्षांनी सार्वजनिक शौचालयांचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मात्र, धारावीत बहुतांशी शौचालये जीर्ण अवस्थेत आहेत. धारावीतील ज्येष्ठ समाजसेवक विकास रोकडे यांनी या परिस्थितीबाबत खंत व्यक्त केली. "सार्वजनिक शौचालयांमधील अस्वच्छतेमुळे धारावीतील महिलांची मोठी गैरसोय होत असून ही शरमेची बाब आहे" अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. धारावी पुनर्विकासानंतर तरी हे चित्र बदलेल. धारावीतील प्रत्येक घराला स्वतंत्र शौचालय, पुरेसे पाणी आणि वीज उपलब्ध होईल. विशेषतः महिलांची गैरसोय कायमची मिटेल, असा विश्वास कोरडे यांनी व्यक्त केला.
"धारावीतील महिलांना अनेक आघाड्यांवर संघर्ष करावा लागतो. सार्वजनिक शौचालयांमुळे इथल्या महिलांची नेहमीच कुचंबणा होते. मात्र, कुटुंब आणि समाजाच्या दबावामुळे आम्हाला मुकाट्याने हे सगळं सहन करावं लागतं."
- सरस्वती व्हटकर, अंगणवाडी सेविका, इंदिरा नगर,धारावी.
"लग्नानंतर मी बारामतीहून धारावीत आले. त्यावेळी सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा लागला. इथल्या अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा मला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा सामना करावा लागला. कालांतराने माझ्या पतीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आम्ही घरातच शौचालय बांधले."
-लक्ष्मी यादव, वय ५४वर्षे, केळकर चाळ,धारावी
"सार्वजनिक शौचालयांमधील अस्वच्छतेचा फटका सगळ्यात जास्त महिलांना बसतो. टॉयलेट सीटच्या थेट संपर्कामुळे बहुतांशी महिला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनच्या (यूटीआर) बळी ठरतात.त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये शौचालयांची स्वच्छता अत्यावश्यक आहे."
- डॉ. फारुक शेख,रेशम नर्सिंग होम