अरविंदराव भिडे रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक होते. परिवारातील अनेक संस्थांशी ही त्यांचा निकटचा संबंध होता. ‘सहकार भारती’ या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश सहकोषाध्यक्ष व अखिल भारतीय कोषाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. नुकतेच त्यांचे वयाच्या ८६व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना जाऊन आज १५ दिवस झाले. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा हा लेख...साल १९८७. मी नुकताच ‘सहकार भारती’च्या कार्यालयात रुजू झालो होतो. एक दिवस सतीश मराठेंनी मला एक पत्र लिहायला सांगितलं आणि अरविंदराव भिडे यांना कॅनरा बँकेच्या मुंबईच्या कार्यालयामध्ये बहुदा मेकर चेंबर किंवा टॉवर येथे भेटायला सांगितलं. त्याप्रमाणे मी गेलो. प्रथमदर्शनी कडक शिस्तीचे अरविंदराव शांत, परंतु अत्यंत निग्रही स्वभावाचे असावेत, अशी माझी भावना झाली.
अरविंदराव मूळचे रायगड जिल्ह्यातील पालीचे. १९३९ सालचा त्यांचा जन्म. वयाच्या ११व्या वर्षी ते शिक्षणासाठी मुंबईत आले. पोद्दार व रुपारेल महाविद्यालयांमधून त्यांनी ‘बी.कॉम.’ तसेच ‘बी.ए.’ ही पदवी मिळवली. मैदानी खेळ, कुस्ती, व्यायामाची त्यांना आवड होती. त्यातील अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी बक्षिसे मिळविली. एक हजार सूर्य नमस्कार घालण्याच्या स्पर्धेतही त्यांनी बक्षीस मिळविले होते. मुंबईत आल्यावर त्यांचा संघकामाशी संपर्क आला व तो शेवटपर्यंत राहिला. काही काळ त्यांनी जनसंघाचेही काम केले. गृहिणी असलेल्या आशा वहिनीच्या भक्कम पाठिंब्यामुळे अनेक सामाजिक कामात त्यांना सक्रिय सहभाग घेता आला. तरुणांनी उद्योजकतेकडे वळले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. अतुल आणि आल्हाद या आपल्या दोन्ही मुलांना त्यांनी व्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले. आल्हाद व त्याच्या मित्रांना बरोबर घेऊन त्यांनी ‘आधार’ ही ‘एनजीओ’ स्थापन केली. व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकीचा संस्कारही त्यांनी आपल्या पुढच्या पिढीत संकरित केला.
अरविंदराव मालाड येथे राहात असत. एका मित्राला बँकेकडून कर्ज मिळत नव्हते. म्हणून शरदराव साठे, डॉ. वाकणकर अशा पाच-सहा समवयस्क मित्रांना बरोबर घेऊन अरविंदरावानी एका सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. त्याचे कार्यालयीन कामकाज आपल्या राहत्या चाळीतल्या घरातूनच सुरू केले. त्याच पतसंस्थेचे रुपांतर पुढे मालाड सहकारी बँकेत झाले. अरविंदराव त्या बँकेचे संस्थापक- संचालक होते. आज एक नावाजलेली बँक म्हणून ती बँक ओळखली जाते. मालाडमध्ये त्यांनी हमालांची सहकारी पतसंस्थाही स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले होते.
‘सहकार भारती’च्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या पुनर्रचनेचे काम सुरू होते. अरविंदरावांनी प्रदेश कार्यकारिणीवर सहकोषाध्यक्ष म्हणून काम करावे, अशी विनंती करणारे ते पत्र होते. सतीश मराठेंच्या आग्रहाप्रमाणे त्यांनी ‘सहकार भारती’चे सहकोषाध्यक्षपद स्वीकारले व त्यांच्यातल्या निग्रहाची, आर्थिक शिस्तीची ओळख होऊ लागली. ‘सहकार भारती’ची स्थापना झाल्यावर कार्यालयीन व्यवस्था नीटशी लागली नव्हती. त्यामुळे अरविंदरावांना अपेक्षित असलेल्या आर्थिक शिस्तीची वानवा होती, हिशोबात कोणतेही गैरव्यवहार किंवा गैरप्रकार नव्हते. परंतु, त्याचे व्यवस्थित लिखाण, लेखापरीक्षण याची त्रुटी होती. सतीश मराठे व अरविंदरावांनी हे हिशोब पूर्ण करण्याचे मनावर घेतले.
त्यांची नुकतीच हृदयशस्त्रक्रिया झाल्यामुळे कॅनरा बँकेतून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती व ते घाटकोपरला दामोदर पार्कमध्ये राहायला आले होते. मग ठिकठिकाणची ‘सहकार भारती’ची पासबुके गोळा करायची. खतावणी, लेजर लिहायचं, ट्रायल बॅलन्स, जमा खर्च खाते, बॅलन्स शीट तयार करायची. असे काम सुरू झालं. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आठवड्यातून दोन-तीन वेळा त्यांची प्रत्यक्ष भेट घ्यायची आणि वर्षावर्षांचे हिशोब पूर्णत्वास न्यायचे अशा पद्धतीने आम्ही १२ वर्षांचे हिशोब पूर्ण केले.
हिशोब पूर्ण करण्याची ही प्रक्रिया खूप शिकण्यासारखी आणि आनंददायी होती. बॅलन्स शीट टॅली झाली की हिशोब पूर्ण. एकदा एका वर्षाचे हिशोब पूर्ण होईनात, सारखा फरक लागत होता, सगळ्या बाजूंनी तपासलं तरी फरक सापडेना. रात्रीचे ८.३० झालेले, अरविंदराव म्हणाले, "आज बॅलन्स शीट तयार झाल्याशिवाय तू घरी जायचं नाहीस” आणि वहिनींना सांगितलं, "आज उदय आपल्याकडे जेवेल.” हाती घेतलेले काम पूर्णत्वास गेलेच पाहिजे, हा ध्यास यातून दिसला. हिशोब पूर्ण झाल्यावर त्याचे लेखापरीक्षण करण्यासाठी ठाणे येथील प्रसिद्ध लेखापरीक्षक व ठाणे जनता सहकारी बँकेचे संचालक केळकर साहेबांकडे आम्ही गेलो. तेथे भिडे साहेब मिश्किलपणे म्हणाले, "आम्ही हिशोब पूर्ण करायला उशीर लावलाय, पण तुम्ही लेखापरीक्षणाला तेवढा वेळ लावू नका!”
अरविंदरावांनी जनकल्याण सहकारी बँकेत उपसरव्यवस्थापक म्हणून काम केलं. त्याचप्रमाणे डोंबिवली नागरी सहकारी बँकेतही उपसरव्यवस्थापक व प्रभारी सरव्यवस्थापक म्हणून काम केलं. वेळेबाबतची शिस्त, कामकाजातील काटेकोरपणा याबाबत त्यांनी कधीही तडजोड केली नाही. एका बँकेत एक कर्ज प्रस्ताव चर्चिला जात होता, कागदपत्रात काही त्रुटी होत्या. हे कर्ज प्रकरण मंजूर करण्यास अरविंदराव तयार नव्हते. संचालक मंडळातील एका संचालकांचा हे कर्ज मंजूर करावे, असा आग्रह होता व त्या व्यक्तीला कोणतीही बँक कर्ज देईल, असे त्यांचे म्हणणे होते. हे ऐकल्यावर भिडे साहेबांचा संयम संपला, त्या कर्ज प्रकरणाच्या कागदांची भेंडोळी त्यांनी हातात घेतली आणि त्या संचालकांसमोर ती ठेवली आणि म्हणाले, "या कागदपत्रांवर कोणती बँक कर्ज देते, ते मला दाखवाच.” सहकारी बँकांमध्ये एवढा निडरपणा दाखवणारे अधिकारी वानगीदाखलच असतील. नामांकित व प्रतिष्ठित सहकारी बँकांबरोबरच अरविंदरावांनी आपला अनुभव लहान सहकारी बँकांसाठीही उपयोगात आणला. भिलई येथील महिला सहकारी बँक आर्थिक अडचणीत आली होती. त्यावेळी अरविंदरावांनी प्रत्यक्ष भिलई येथे राहून, त्या बँकेचे कामकाज रुळावर आणण्यात मोलाची भूमिका बजावली. संघकाम करणार्या कार्यकर्त्यांबाबत त्यांना आस्था वाटत असे. पण त्याचा बुरखा पांघरून विपरीत काम करणार्यांबद्दल मात्र त्यांना तिटकारा होता. एकदा एका कार्यकर्त्याची एका बँकेत नोकरीसाठी निवड झाली होती. परंतु, नियुक्तीपत्र मिळाले नव्हते, हे अरविंदरावांना माहीत होते. नियुक्तीपत्र मिळण्यास विलंब होत आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या कार्यकर्त्याला विचारले, "काही अडचण आहे का? त्या बँकेच्या संबंधितांशी बोलू का?” कार्यकर्त्यांची अडचण दूर करणे, त्यांच्यावर अन्याय होऊ न देणे, हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे प्रत्यक्ष वागणुकीतून दाखवून देणारे अरविंदराव विरळेच.
गरीब, अज्ञानी, अशिक्षित जनतेबद्दल त्यांना कळवळा होता. वयाच्या ६५व्या वर्षांपासून साधारणतः वयाच्या ८१ वर्षांपर्यंत ते रेल्वे, एसटी, टमटम प्रसंगी चालत प्रवास करून, त्यांना साक्षर करण्यासाठी, प्राथमिक स्वच्छतेचे धडे देण्यासाठी मुरबाड, शहापूर, पडघ्याजवळच्या आदिवासी पाड्यांवर ते जात असत. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार मिळावा, यासाठीही ते प्रयत्नशील असत. त्यासाठी काही सहकार्यांना समवेत घेऊन एक कंपनीही स्थापन केली. परंतु, काहीजणांच्या निष्क्रियतेमुळे, असहकार्यामुळे व अयोग्य वागणुकीमुळे त्यांचा तो प्रयत्न असफल झाला. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानही सोसावे लागले. एक सामाजिक उपयुक्तता म्हणून, त्यांनी वहिनींच्या मदतीने विवाह मंडळ चालवले. आपल्या कोणत्या ना कोणत्या कृतीने समाजोपयोगी काम करत राहणे, हा अरविंदरावांचा पिंड होता. त्यासाठी त्यांनी प्रकृतीची, वयाची कधी पर्वा केली नाही. आपल्या मृत्यूनंतरही देहदान करून त्यांनी हा वस्तुपाठ कायम ठेवला.
सहकारी क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन डोंबिवली नागरी सहकारी बँकेने ‘सहकार मित्र’ हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कमही त्यांनी सामाजिक संस्थांना देणगी म्हणून प्रदान केली. निःस्वार्थी, शांत, निग्रही आणि कामाबाबत कडक शिस्त बाळगणारे अरविंदराव आता आपल्यात नाहीत. त्यांचे हे गुण अंगी बाळगणे व ते अमलात आणणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.