
संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये प्रतिमांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा. लोकसमूहला एकत्र करून, एखाद्या विचाराचा पाया रचायचा असेल, तर त्यासाठी अनुकूल त्या प्रतिमासुद्धा समाजात असाव्या लागतात. आधुनिक काळात पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये सरंजामशाही, राजेशाही यांच्याविरोधात ज्या राष्ट्रांनी लढा दिला, त्या राष्ट्रांनी समाजकारणात, राजकारणात संघर्ष केला, परिवर्तन घडवून आणले हे सत्यच. परंतु, त्याचबरोबर, आपल्या त्या त्या संघर्षाच्या सांस्कृतिक खुणासुद्धा त्यांनी जपून ठेवल्या. किंबहुना, त्या त्या प्रतिमांच्या माध्यमातून विशिष्ट समूहांचा संघर्ष लक्षात राहावा, यासाठी वारंवार या प्रतिमांचा वापर केला जातो. एखादे राष्ट्र संपूर्णपणे काबीज करायचे असेल, तर त्याच्या सांस्कृतिक पाऊलखुणांवरसुद्धा विजय मिळवावा लागतो. व्यक्ती आणि समूहाच्या जीवनातील या प्रतिमांना लक्ष्य केले की, आपसूकच त्या त्या राष्ट्रावर अंकुश निर्माण केला जातो. आता एवढे मोठे, प्रतिमापुराण मांडण्यामागचे कारण म्हणजे, सध्या अमेरिकेत सुरू असलेले प्रतिमांचे राजकारण!
एमी शेराल्ड यांच्या ‘ट्रान्सफॉर्मिंग लिबर्टी’ या चित्राने सध्या अमेरिकेत नवा वाद निर्माण झाला आहे. ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’चे नवे प्रारूप म्हणून समोर आलेले हे चित्र सध्या वादाच्या भोवर्यात सापडले आहे. ‘ट्रान्सफॉर्मिंग लिबर्टी’ या चित्रामध्ये एक कृष्णवर्णीय ट्रान्स महिला, ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या मुद्रेसारखी उभी असल्याचे आपल्याला बघायला मिळते. तिच्या हातामध्ये एक मशाल आहे, पण त्या मशालीत अग्नी तेवत नसून, फुलं आहेत. सदर चित्राच्या माध्यमातून तत्कालीन अमेरिकेतील ट्रान्सजेंडर, कृष्णवर्णीय महिलांच्या जाणीवांची अभिव्यक्ती दर्शवण्यात आली आहे. स्मिथसोनियनच्या ‘नॅशनल पोर्ट्रेट गॅलरी’मध्ये सदर चित्राचे प्रदर्शन भरवण्यात येणार होते. मात्र, तत्कालीन सत्ताधारी पक्ष आणि जनक्षोभ लक्षात घेता, एमी शेराल्ड यांचे चित्रप्रदर्शन रद्द करण्यात आले. एमी शेराल्ड यांनी २०१८ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांचेही चित्र रेखाटले होते. मिशेल ओबामा यांचा आत्मविश्वास दर्शवणार्या या चित्रामुळे एमी शेराल्ड प्रकाशझोतात आल्या. ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ला आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून लक्ष्य केल्यामुळे शेराल्ड वादाच्या भोवर्यात सापडल्या आहेत. काहींच्या मते, एमीच्या चित्राच्या माध्यमातून अमेरिकेचे वास्तव प्रतीत होते, तर काहींनी एमीच्या चित्रावर आक्षेप नोंदवला असून, तिची अभिव्यक्ती अमेरिकेच्या सांस्कृतिक मूल्यांशी सुसंगत नसून, उलट त्या मूल्यांना पायदळी तुडवणारी आहे, असे मत व्यक्त केले आहे.
न्यूयॉर्कच्या लिबर्टी बेटावर उभा असलेला ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ ही अमेरिकेच्या परिचयाचे पहिले चित्र. फ्रेडरिक ऑगस्टे बार्थोल्डी या फ्रेंच शिल्पकाराने तयार केलेले हे शिल्प, १८८६ साली अमेरिकेच्या किनार्यावर दाखल झाले. अमेरिकेच्या गृहयुद्धातील विजयाच्या पार्श्वभूमीवर फ्रेंचांनी अमेरिकेला हे शिल्प भेट म्हणून दिले. ग्रीक पुराणामध्ये आपल्याला ‘लिबरटास्’ या स्वातंत्र्यदेवतेचा उल्लेख आढळतो. या स्वातंत्र्यदेवतेवर आधारित शिल्प तयार करण्यात आले. दीडशे फूट उंचीचा हा अजस्त्र पुतळा, अमेरिकेतील नागरिकांच्या अभिमानाचा विषय ठरला नसता, तरच नवल. पुढे या पुतळ्याच्या असंख्य प्रतिकृती जगभरात उभारण्यात आल्या. अमेरिकेचा स्वातंत्र्यलढा, त्या लढ्यात बलिदान दिलेले सैनिक, लोकशाही शासनव्यवस्था या सगळ्या प्रतिमा अमेरिकेतील व्यापक विचारविश्वाचा अविभाज्य भाग बनला आहे.
साहजिकच अशा लोकप्रिय प्रतिमांवर वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने भाष्य केले जाते. कलाविश्वामध्ये अशा प्रतिमांवर भाष्य करायला मुक्तता असते. मात्र, तत्कालीन अमेरिकेचे सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वातावरण लक्षात घेता, एकप्रकारे कलाकारांवर निर्बंध आले असल्याचे आपल्याला दिसून येते. ट्रम्प सत्तास्थानी रुढ झाले आणि आपल्या सत्ताबळावर त्यांनी वेगवेगळ्या संस्थांना निर्देश देण्याचे काम सुरू केले. ‘स्मिथसोनियन’ या संशोधन संस्थेला ट्रम्प यांनी चांगलेच धारेवर धरले. ही सरकारी संस्था नसून, खासगी संस्था आहे. खासगी संस्थेच्या व्यवहारांवर सरकारने, राष्ट्राध्यक्षांनी अशा रितीने आपली सत्ता गाजवावी का, हा चर्चेचा मुद्दा असू शकतो. परंतु, येनकेनप्रकारे लोकशाहीचा विचार जगभरात पसरवणारे राष्ट्र, आपल्याच कलावंतांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर काय भूमिका घेते, याकडे सगळ्या जगाचे लक्ष आहे.