नुकत्याच संपन्न झालेल्या २०व्या समरसता साहित्य संमेलनात सामाजिक समावेशाचा नवा अध्याय लिहिला गेला. या भव्य संमेलनात किन्नर समाजाचे प्रभावी प्रतिनिधित्व पाहायला मिळाले. यावेळी पारंपरिक साहित्यिक व सामाजिक चर्चेसोबतच किन्नर समुदायाच्या सांस्कृतिक, भावनिक आणि राष्ट्रीय जाणिवा व्यक्त करणारा दृष्टिकोन समोर आला. या सर्वांचा आढावा घेणारा हा लेख...गोदाकाठच्या समरसतेच्या या महोत्सवात अठरापगड आणि बाराबलुतेदार जातींतील साहित्यिक, शिलेदार आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होतीच. पण, यांच्यासोबत किन्नर समुदायानेदेखील आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पारंपरिक वेशभूषेत मंचावर येऊन त्यांनी आपली सांस्कृतिक नृत्यकला सादर केली. कवितांच्या माध्यमातून आपल्या भावनांना शब्दरूप देताना त्यांनी समाजात ‘तृतीयपंथीय’ या ओळखीच्या पलीकडील जीवनशैली, स्वप्ने आणि संघर्ष मांडले. इतकेच नव्हे, तर किन्नर समुदायाने या संमेलनाच्या आयोजनात हातभार लावण्याचीही इच्छा व्यक्त केली.
किन्नर प्रतिनिधींनी स्पष्टपणे मांडले की, "आज किन्नर समुदाय केवळ विद्रोहासाठी नव्हे, तर सनातन विचारसरणीशी आणि व्यापक सामाजिक नैतिक मूल्यांशी बांधिलकी जपत आपल्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी नव्या दिशा शोधत आहे.”
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्याच्या सहयोगी संस्थांकडून सुरू असलेल्या ‘किन्नर विकास परिषदे’च्या कार्याचा उल्लेख संमेलनात विशेषतः करण्यात आला. ही परिषद केवळ हक्क आणि आरक्षणावर लक्ष केंद्रित करत नाही, तर समाजाचे स्वावलंबन, शिक्षण, आरोग्य आणि राष्ट्रीय एकात्मतेकडे नेणारे कार्य करत आहे. देशभरात किन्नर समाजाचे कार्यकर्ते आज ‘किन्नर विकास परिषदे’तून समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जात आहेत. या परिषदेचे कार्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारत आहे. संमेलनात सहभागी असलेल्या किन्नर प्रतिनिधींनी सांगितले की, "सनातन परंपरा ही केवळ धार्मिक बाब नाही, तर ती जीवनशैली आहे. जो किन्नर ज्या धर्मात जन्मतो, त्याने त्याचे पालन करावे,” असा संदेश त्यांनी दिला. "धर्मपरिवर्तनाचे आमच्या समाजात स्वागत नाही, पण सनातन मूल्यांच्या जागृतीने आम्ही आमचा सांस्कृतिक ठसा अधिक गडद करत आहोत. युगानुयुगे इतिहासात आमचा विशेष उल्लेख असूनही आमच्या समुदायाची आजही योग्य नोंद घेतली जात नाही, पण भविष्यात आमचा इतिहास ठळकपणे लिहिला जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. किन्नर समुदायाच्या सन्मानपूर्वक जीवनासाठी केंद्र सरकारपासून राज्य शासनाकडे विविध योजना असल्या, तरी त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी समाजातल्या संघटनशील चळवळी गरजेच्या आहेत. समरसता साहित्य संमेलनानिमित्ताने अशीच एक सकारात्मक चळवळ पुढे येताना दिसली.
समरसतेच्या आधारावर राष्ट्रीय जीवनमूल्यांना स्पर्श करणारा हा विचारमंथनाचा मंच ठरला. हे संमेलन एक सांस्कृतिक घटना असून, यातून सामाजिक ऐक्य, समरसता आणि राष्ट्राभिमान या मूल्यांची नव्याने पुनर्बांधणी झाली. किन्नर समाजाने यात सहभागी होऊन फक्त आपली उपस्थिती नोंदवली नाही, तर राष्ट्रीय जीवनधारेत योगदानाची नवी दिशा दाखवली.
समरसता संमेलनात किन्नर समाजाचा सहभाग म्हणजे केवळ सांस्कृतिक नव्हे, तर वैचारिक आणि सामाजिक परिवर्तनाची सुरुवात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ‘किन्नर विकास परिषदे’सारख्या संस्था तृतीयपंथीयांसाठी नवदिशा घडवताना त्यांच्या स्वाभिमानाला उभारी देत आहेत.
- अर्पिता भिसे, सदस्य-तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य किन्नर विकास परिषद, महाराष्ट्र
आम्ही कधीच धर्मांतर केले नाही, कारण सनातन मूल्यांवर आमचा विश्वास अढळ आहे. पण, तरीही समाजाने आम्हाला केवळ मनोरंजनाचे साधन, भीक मागणारे किंवा उपेक्षित मानले. आमचंही आत्मभान आहे, इतिहास आहे, संस्कृती आहे. उपेक्षेचं हे सावट आम्ही आता झटकून टाकणार आहोत.
-गुरूमाय फरीदा बकश,संयोजक, किन्नर विकास परिषद