नवी दिल्ली : (Red Fort Security) स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून भाषण करणार असताना, किल्ल्याच्या सुरक्षा व्यवस्थेत एक मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. याप्रकरणी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सात पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यात १५ ऑगस्टपूर्वी एक मॉक ड्रिल घेण्यात आली होती, ज्यामध्ये दिल्ली पोलिसांचे एक विशेष पथक नागरी पोशाखात डमी बॉम्बसह किल्ल्यात प्रवेश करत होते. त्यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांना ही बाब लक्षात आली नाही. या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणा समोर आला आहे. सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा करणाऱ्या कॉन्स्टेबल आणि हेड कॉन्स्टेबलसह सात दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले.
बांगलादेशींकडून किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न
या घटनेनंतर सोमवारी आणखी एक गंभीर बाब समोर आली. पाच बांगलादेशी नागरिक अवैधरित्या लाल किल्ल्यामध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात होते. त्यांनाही पकडण्यात आले आहे. या दोन्ही घटनांमुळे लाल किल्ल्याच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.