मॉस्को : (Krasheninnikov Volcano erupts after 600 years in Russia) रशियामध्ये तब्बल ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच क्रॅशेनिनिकोव्ह (Krasheninnikov) ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. कामचात्का बेटांवर स्थित हा ज्वालामुखी आहे. रशियाची सरकारी वृत्तसंस्था आरआयएने आणि वैज्ञानिकांनी याविषयी माहिती रविवारी ३ ऑगस्टला दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ज्वालामुखीचा उद्रेख झाल्यानंतर यातून बाहेर पडणाऱ्या राखेचे लोट हे ६,००० मीटर उंचीपर्यंत पोहोचले होते. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रशियातील सरकारी माध्यमांनी जारी केलेल्या फोटोंमध्ये क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीमधून मोठ्या प्रमाणात राखेचे लोट निघत असल्याचे दिसून येत आहेत. हे राखेचे लोट ज्वालामुखीपासून पूर्वेकडे पॅसिफिक महासागराच्या दिशेने निघून गेले. त्याच्या मार्गात कोणतीही लोकवस्ती नाही आणि जेथे लोक राहातात त्या ठिकाणी राख पडल्याची नोंद झालेली नाही. यामुळे आजूबाजूच्या रहिवासी भागाला कोणताही धोका निर्माण झालेला नाही.
स्मिथसोनियन इंस्टिट्यूटशनच्या ग्लोबल वॉल्कॅनिझम प्रोग्रामनुसार यापूर्वी या ज्वालामुखीचा उद्रेक हा १५५० मध्ये झाला होता, एफपीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
युरोप आणि आशियामधील सर्वात उंच सक्रिय ज्वालामुखी क्लुचेवस्कॉय मधून बुधवारी लावा बाहेर पडल्यानंतर अगदी काही दिवसांतचा क्रॅशेनिनिकोव्ह ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. यामुळे विमान वाहतुकीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे या भागातील विमान सेवेवर परिणाम होऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.