इशरत जहाँ विसरलात का? केशव उपाध्ये यांचा जितेंद्र आव्हाडांना सवाल

04 Aug 2025 16:16:34

मुंबई : जितेंद्र आव्हाड, इशरत जहाँ विसरलात का? इशरत जहाँचा गौरव करणाऱ्या बाटग्यांना सनातन धर्माबद्दल बोलायचा अधिकार नाही, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या विधानानंतर उपाध्ये यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.

केशव उपाध्ये म्हणाले की, "अजूनही रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचा हिंदू द्वेष आणि मतांच्या राजकारणासाठीचे लांगूलचालन काही कमी होत नाही. जी उदाहरणे आव्हाड आणि पवार देतात, हिंदु समाजात त्यांचे कोणीच समर्थन करत नाही. तर त्यांना गुन्हेगारच समजतात. पण दहशतवाद्यांचे कौतुक याच आव्हाडांनी केले होते. इशरत जहाँ विसरलात का? बाटला हाऊस येथे दहशतवाद्यांचे एन्काऊंटर झाल्यावर सोनिया गांधींच्या डोळ्यात अश्रू आले होते. पवित्र त्यागी अशा भगवा रंगावरून दहशतवाद हा शब्द काँग्रेसने आणत हिंदूना दहशतवादी ठरविण्याचा प्रयत्न केला."

एकदा मुस्लिम दहशतवादी असा उल्लेख करून दाखवा

"जितेंद्र आव्हाड यांनी ‘सनातनी दहशतवादी’ अशी बरीच पोपटपंची केली. पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूंची हत्या करणाऱ्यांचा एकदा मुस्लिम दहशतवादी असा उल्लेख करून निषेध करून दाखवा. सनातन धर्माची बदनामी करताना आनंदाच्या उकळ्या फुटतात आणि मुस्लिम दहशतवादी म्हणताना काय फुटते की, फाटते? इशरत जहाँचा गौरव करणाऱ्या बाटग्यांना सनातन धर्माबद्दल बोलायचा नैतिक अधिकारच नाही," असे ते म्हणाले.

रोहित पवारांच्या ढोंगीपणाला जनता फसणार नाही

"दौंडमध्ये हिंदूंच्या श्रद्धास्थानाचा अपमान झाला तेव्हा हिंदू आठवले का? तुमचे सरकार असताना हनुमान चालिसा म्हटल्याबद्दल नवनीत राणा यांना तुरुंगात डांबले तेव्हा, हिंदू आठवले का? आता हिंदू दहशतवादाचा नॅरेटिव्ह पसरविण्यासाठी हिंदू शेतकरी आणि युवकांची तुम्हाला आठवण आली. असल्या ढोंगीपणाला जनता फसणार नाही. तुमचे खरे रूप हिंदू समाज ओळखून आहे," अशी टीकाही केशव उपाध्ये यांनी रोहित पवारांवर केली.
Powered By Sangraha 9.0