वाहनधारकांनो लक्ष द्या! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी यापुढे मुदतवाढ नाही, आता थेट कारवाई होणार

04 Aug 2025 11:13:40
 
मुंबई : (HSRP Number Plate) जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवण्यात येणार नाही. परिवहन विभागाने १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत नागरिकांना मुदत दिली आहे. पण यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, केवळ १० दिवस शिल्लक आहेत. सर्व वाहनधारकांनी ही अंतिम मुदत संपण्यापूर्वी नंबर प्लेट बसवून घेणे आवश्यक आहे, अन्यथा थेट दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

यापूर्वी एप्रिल अखेर त्यानंतर जून अखेर आणि आता १५ ऑगस्टपर्यंत अशी तीनवेळा ही मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, या पुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी येत होत्या. वाहनांसाठी प्लेट्सची मर्यादित उपलब्धता, ऑनलाइन बुकिंगमधील तांत्रिक अडचणी, फिटमेंट सेंटरवरील प्रचंड गर्दी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या मर्यादा, यामुळे अनेकांना नंबर प्लेट्स बसवण्यात अडचणी येत होत्या. या सर्व अडचणींमुळेच ही तिसरी आणि शेवटची मुदतवाढ देण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे कायद्याने बंधनकारक आहे. 

वाहनधारकांनी http://transport.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर किंवा परिवहन विभागाच्या संबंधित पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. त्यानंतर जवळच्या अधिकृत फिटमेंट सेंटरवर जाऊन एचएसआरपी बसवून घ्यावी. परिवहन विभागाने वाहनचालकांना आवाहन केले आहे की, शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी.




Powered By Sangraha 9.0