झारखंडचे 'दिशोम गुरुजी' शिबू सोरेन काळाच्या पडद्याआड, दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

04 Aug 2025 13:13:42

नवी दिल्ली : (Former Jharkhand CM Shibu Soren Passes Away) झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे ते वडील होते. शिबू सोरेन यांनी तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्रिपद भूषवले परंतु शिबू सोरेन यांची कारकीर्द बरीच वादग्रस्त ठरली. आदिवासी बांधव आणि वंचितांच्या हक्कांसाठी त्यांनी सदैव लढा दिला.

जुलैमध्ये शिबू सोरेन यांना किडनीच्या विकारामुळे रुग्णालयात भरती करण्यात आले होते. गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी आणि नेफ्रोलॉजीमधील तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत होती. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. शिबू सोरेन यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


कोण होते शिबू सोरेन?

शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक सदस्य होते आणि त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी संघर्ष केला. शिबू सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झारखंड मुक्ती मोर्चाने आदिवासी भागांमध्ये सामाजिक आणि राजकीय जागृतीचे अभियान चालवले. राज्याला वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. झारखंडला एक नवी ओळख मिळवून देण्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे.  

'दिशोम गुरु' का म्हटलं जायचं?

शिबू सोरेन यांना 'दिशोम गुरु' असेही संबोधले जात असे. सावकारी प्रथेविरोधात शिबू सोरेन यांनी चळवळ उभी केली होती. त्यासाठी त्यांनी आदिवासी समाजाला संघटित करण्याचे काम केले. धन कटनी आंदोलन खूप गाजले होते. या आंदोलनादरम्यान ज्या शेतात धानाची कापणी होत असे त्या शेताच्या बांधावर आदिवासी युवक धनुष्य बाण घेऊन उभे राहायचे. हे आंदोलन शिबू सोरेन यांच्या नेतृत्वात झाले होते. याच आंदोलनादरम्यान त्यांना दिशोम गुरु अशी लोकउपाधी मिळाली. संथाली भाषेत दिशोम गुरु या शब्दाचा अर्थ होतो देशाचा गुरु. लोक त्यांना त्याच नावाने संबोधू लागले होते.




Powered By Sangraha 9.0