गणानां त्वा गणपतिम्...

31 Aug 2025 13:32:31

संपूर्ण भारतात गणपतीचा उत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा होतो. येणाऱ्या-येऊ घातलेल्या विघ्नांचा नाश करून मांगल्याची स्थापना करणारा हा देव. सर्व शुभकार्यांची सुरुवात गणेशपूजनानेच आपल्याकडे होते. गणेशपुराण, मुद्गलपुराण या ग्रंथांमध्ये गणपतीबद्दल विस्तृत विवेचन आले आहे. गणपतीच्या उत्पत्तीबद्दल अनेक विविध कथा वाचायला मिळतात. त्याबद्दल एकवायता नाही, मात्र ‘संकटमोचन’ म्हणून त्याचे महत्त्व अखंड आहे. गणेशपुराणात तर चार युगांचे चार गणपती सांगितले आहेत. सत्ययुगात असतो विनायक, तो दशभुज असून सिंहावर आरूढ असतो. त्रेतायुगातला मयुरेश्वर सहा हातांचा असून तो मोरावर स्वार असतो. द्वापारयुगातल्या गणपतीचे नाव ‘गजानन’ असून तो चतुर्भुज असतो, त्याचे वाहन उंदीर असते. धूम्रकेतु हा कलियुगातला गणपती असून तो द्विहस्त असतो, तर त्याचे वाहन घोडा असते. आपण जेव्हा केव्हा गणपती बघू, त्यावेळी तो कुठला आहे, हे बघायला सर्वांनी सुरू करा.

आज आपण गणपतीच्या वेगवेगळ्या शिल्पांचा परिचय करून घेणार आहोत. पण त्या फोटोस्टोरीकडे जायच्या आधी आपणही गणेशवंदनानेच याची सुरुवात करूया.

गणानां त्वा गणपतिं हवामहे
कविं कवीनामुपमश्रवस्तमम्|
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत
आ नः श्रृण्वन्नूतिभिः सीद सादनम्॥


अर्थ - समुदायाचा प्रभू म्हणून तू गणपती. ज्ञानीजनांत तू अत्यंत ज्ञानी. कीर्तिवंतांमध्ये तू वरिष्ठ. तूच राजाधिराज. तुला आम्ही आदराने बोलावतो. तू आपल्या सर्व शक्तींसह ये आणि या आसनावर विराजमान हो.

अथर्वशीर्षात गणपतीची एकदन्त, धूम्रवर्ण, विनायक, वक्रतुण्ड, लम्बोदर अशी अनेक नावे येतात. यातून गणपती मूर्तीचे वर्णन आपल्याला समजते.

एकदंत - गणपती आपला हा तुटलेला दात फक्त हातात धरत नाही, तर तो त्याचा शस्त्र म्हणूनदेखील वापर करतो. गणपती ‘एकदंत’ कसा झाला, याच्या अनेक कथा आहेत. परशुरामाचा परशु लागून एक दात तुटला; उपहासाने बघणार्या चंद्राला आपलाच दात तोडून फेकून मारला; देवान्तक नावाच्या असुराचा संहार करण्यासाठी आपल्या दाताचा उपयोग केला इत्यादी अनेक कथा याच्याशी निगडित आहेत.

प्रस्तुत शिल्प मुंबईमधील ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय’ इथे असून साधारण ११व्या शतकातले आहे. डावीकडून उजवीकडे बघताना एका हातात पकडलेला दात, तुटलेला हात, पद्म आणि मोदकपात्र अशा गोष्टी दिसतात. अंगावर यज्ञोपवितासारखा घेतलेला नाग दिसतो, तर पायाशी मूषक वाहनदेखील कोरलेले आहे. संग्रहालयातील माहितीनुसार हे शिल्प ठाणे भागात मिळालेले आहे.

नृत्यगणेश - शिवाप्रमाणेच गणपतीदेखील नृत्यात विशारद होता, फक्त नृत्यच नाही, तर ६४ कलांचा तो नायक आहे. नृत्यगणेशाची शिल्पे मोठ्या प्रमाणात मंदिरावर दिसतात. याचे महत्त्व एवढे आहे की, समर्थांनी दासबधामध्ये सुरुवातीला नृत्यगणेशाला वंदन केले आहे.

खजुराहोच्या मंदिरात जी असंख्य सुंदर शिल्पे आहेत, त्यातलाच एक म्हणजे हा नृत्यगणेश. हातात दात, पद्म, परशु, नाग या गोष्टी आहेत, तर एक हात कमरेवर आहे. लक्ष देऊन काम करताना जी एक बारिक आठी कपाळावर येते, तशीच आठी इथेदेखील दिसते, पायाशी वाद्यवृंद आहे. पण यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थिरशिल्पात कलाकाराने कोरलेली हालचाल. नृत्य करत असताना गिरकी घेऊन समेवर परत येणारा क्षण कलाकाराने इथे कोरलेला आहे. त्याच्या पोटाकडे बघितल्यावर लक्षात येईल की, पोटाचा एक भाग बरोबर डावीकडे कललेला आहे. शिल्पातली हालचाल दिसू लागली की, शिल्पे जास्त छान समजू लागतात.
 
गणपतीचे वाहन हे उंदीर आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. इंद्राच्या दरबारात क्रौंच नावाचा गंधर्व होता. त्याची लाथ चुकून वामदेवाला लागली. वामदेवाने चिडून त्याला मूषक होण्याचा शाप दिला. मूषक होऊन पराशर ऋषींच्या आश्रमात त्याने सर्व गोष्टी कुरतडून त्रास द्यायला सुरुवात केली. पराशर ऋषींनी गणपतीची आराधना केली. गणपतीने पाश टाकून मूषकाला थांबवले. त्यानंतर मूषक हा गणपतीचे वाहन म्हणून ओळखला जाऊ लागला. उद्ध्वस्त करणार्या ताकदीला आवर घालणारा-थांबवणारा म्हणून तो विघ्नहर्ता.

पायाशी मूषक वाहन असलेला गणपती हातात अक्षमाला, पद्म, परशु, मोदकपात्र धारण केलेला आहे.

उच्छिष्ठ गणेश - तंत्रसाधनेमध्ये या गणपतीचे खूप महत्त्व आहे. अतिशय दुर्मीळ प्रकारची ही शिल्पे, संकल्पना असून उत्तरेपेक्षा दक्षिणेकडे या प्रतिमा जास्त मिळतात. तामिळनाडूत गंगयकोंडचोलपुरं गावात बृहदेश्वर मंदिरात हे शिल्प आहे. गणपती शक्तीबरोबर मूषकावर आरूढ असून त्याच्या हातात पाश आणि अंकुश आहेत. मांडीवर बसलेली शक्ती दोन्ही हात जोडून आहे, तर गणपती आपल्या सोंडेने तिच्या गुप्तांगांना स्पर्श करत आहे.
मंत्रमहार्णव नावाच्या रचनेत याबद्दल विस्तृत विवेचन केलेले आहे.

आपण आज बघितलेली गणपतीची विविध रूपे आपल्याला काहीतरी सांगतात, शिकवतात. पुढच्यावेळी गणेशमूर्ती बघताना केवळ आरास किंवा मूर्तिकाराची कौशल्ये न पाहता, त्या रूपामागचं लपलेलं रूप समजून घेण्याचा एक प्रयत्न आपण सगळे नक्की करूया. आपल्या देवतांना नीट समजून घेऊया.

इंद्रनील बंकापुरे
७८४१९३४७७४

Powered By Sangraha 9.0