मुंबई: मराठी सिनेविश्वातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. छोट्या पडद्यावरची अत्यंत लाडकी अभिनेत्री प्रिया मराठेचं आज निधन झाले आहे. वयाच्या ३८ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. आज (रविवार) पहाटे चार वाजता कर्करोगाने प्रियाचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षभरापासून प्रिया लाइमलाइटपासून दूरच होती. सोशल मीडियावरही ती सक्रिय नव्हती. अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. प्रिया ही अभिनेते शंतनू मोघे यांची पत्नी आहे. दोघांनी अनेकदा एकत्र कामही केलं होतं.
प्रियाने ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत शेवटचं काम केले . परंतु ही मालिकासुद्धा तिने मधेच सोडली होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं. पण यानंतर प्रिया कोणत्याही मालिकेत किंवा सिनेमात दिसली नाही. तर सोशल मीडियावर देखील तिने २०२४ मध्ये शेवटची पोस्ट केली आहे.
दरम्यान मालिका सोडताना प्रियाने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात तिने म्हटलं होत, “आरोग्याच्या कारणास्तव मी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा निरोप घेत आहे. या मालिकेत मोनिकाची भूमिका साकारताना मी खूप खुश होते, परंतु शूटिंगचं शेड्युल आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधणं खूप कठीण होतंय. माझ्या आरोग्याची समस्याही अचानकच उद्भवली आहे. मोनिकाच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. परंतु मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. म्हणूनच मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे”.
आज मुंबईतील मीरा रोड इथे प्रियाचं निधन झाले आहे. ती ३८ वर्षांची होती. प्रियाच्या जाण्याने तिचे पती अभिनेते शंतनू मोघे यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.