संतांची गणेशवंदना

    31-Aug-2025
Total Views |

१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती अशी आपल्या लाडया बाप्पाची ओळख! कुठल्याही कार्याच्या आरंभी आपण श्रीगणेशाला वंदन करतो. या बुद्धिदात्याची अनेक रूपांचे वर्णन संत-साहित्यामध्येसुद्धा आले आहे. संत-साहित्यातील श्रीगणेशाचे दर्शन जाणून घेण्याचा या प्रयत्न...

ॐ कार प्रधान रूप गणेशाचे |
हे तिन्ही देवांचे ब्रह्मस्थान ॥


अशा गणेशाचे सर्वव्यापक, सर्वसमावेशक, सर्वस्पर्शी रूप मनाला प्रसन्नता देणारे असते. सर्व विद्या-कलांचे अधिष्ठान म्हणून गणेशाचे स्थान अनन्यसाधारण आहे. सर्व संतांनी, श्रेष्ठांनी या गणेशाला आपल्या ग्रंथारंभी वंदन केले असून, कोणत्याही शुभ कार्यारंभी श्रीगणेशाचेच पूजन केले जाते. सर्व गणांचा, अक्षरांचा, वर्णांचा, स्वर-व्यंजनांचा, संधिसमासांचा अधिपती श्रीगणेशच होय. सर्वाधिक मनोहरी नृत्य करणारा, सर्व वाद्ये पराकोटीच्या रससिद्धतेने वाजविणारा, १४ विद्या-६४ कलांचा अधिपती म्हणजे श्रीगणेश.

श्रीगणेशाची उपासना वैदिक काळापासून होती. ऋग्वेदामध्ये गणेशाला ‘ब्रह्मणस्पति’ म्हणून संबोधले आहे. त्यातील सूक्तांमध्ये गणेशाचे समग्र रूप उलगडून दाखविलेले असून, ‘ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे| ’ अर्थात तो गणांचा पती, त्यांना मार्ग दाखविणारा त्यांचा नेता असल्याचे म्हटले आहे. ऋग्वेदाच्या आठव्या व दहाव्या मंडलामध्ये गणेशाचे स्तवन आले आहे. यजुर्वेदात ऋषिगणांनी श्रीगणपतीला आवाहन करून, ‘आमच्यावर मंगल आशीर्वादांचा पाऊस पाड, वर्षाव कर,’ अशी प्रार्थनाही केली आहे. त्यामध्ये धन, संपत्ती, पुत्र, पौत्र या भौतिक सुखातील काहीही मागितले नाही, तर फक्त ‘हे गणेश सर्वांचे मंगल कर.’ अशीच प्रार्थना केली आहे.

अथर्व वेदात ‘गणपत्यथर्वशीर्ष’ नावाचे एक उपनिषद आहे. गणपतीचे समग्र रूप त्यात दिलेले आहे. सर्व वेदांनीही या गणपतीला शिरोधार्य केले आहे. ज्ञानशक्तीचा उत्थानाचा आरंभ ज्या मूलाधार चक्रापासून होतो, त्या मूलाधाराचे अधिष्ठान गणपतीच आहे. म्हणून अथर्वशीर्षात गणेशाला ‘त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्’ असे म्हटले आहे. यात प्रथम गणपतीच्या सगुण ब्रह्माची उपासना सांगून, शेवटी तो गणपती म्हणजे परब्रह्मच असल्याचे म्हटले आहे.

रामायण-महाभारतामध्येही गणेशाचे स्तवन आले आहे. महाभारताचा तर लेखकच श्रीगणेश आहे. जसा वेदामध्ये गणेश आहे, तसा सर्व ब्राह्मणग्रंथांमध्ये, उपनिषदांमध्ये, सर्व स्मृतिग्रंथांमध्येसुद्धा आहे. सर्व स्मृतिग्रंथांनी अतिशय प्रेमाने गणेशाचे पूजन केले असून, पुराणांनी तर गणेशाचा महिमा गायिला आहे. ‘गणेशपुराण’ व ‘मुद्गलपुराण’ ही दोन पुराणे, श्रीगणेशाचे संपूर्ण स्वरूप स्पष्ट करणारी आहेत. श्रीगणेश दैवताच्या दृष्टीने, या दोन्ही पुराणांचे महत्त्व अनन्यसाधारण असेच.

अशा या गणेशाला सर्वच संतांनी आपल्या ग्रंथलेखनात वंदन केले आहे. त्याला शरण जाऊन त्याची स्तुतीही गायली आहे. गणेशाचे आध्यात्मिक रूपक वर्णिले आहे; तर कुठे त्याच्या नृत्याचे विभ्रम आलेले आहेत. बुद्धिदाता, संकटमोचन उज्ज्वल कार्याचा प्रेरक, प्रेरणास्त्रोत असा रेखाटलेला आहे व त्याचे स्तवन केले आहे. महानुभाव संप्रदायातील साहित्यनिर्मितीतही गणेशवंदन आहे.

संकराचा कुरू | की सांधो गणांचा ईश्वरू |
तो सेंदुर सांडकरू | गोरा भेरू जैसा... |
...गणेशे मनोर्थ मुद्रा दीधली | कविता पाढिये शेष भरली |
तव सारदा देखिली | सारस्वत काळेसी ॥


ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी ॐकाररूपी श्रीगणेशाचे भव्य रूपक रचले आहे. ‘ॐ नमोजी आद्या’ या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीपासून २०व्या ओवीपर्यंत, ज्ञानदेवांनी गणेश वंदन केले आहे.

श्रीगणेशाय नमः | ॐ नमोजी आद्या | वेद प्रतिपाद्या ॥
जयजय स्वसंवेद्या | आत्मरूपा ॥१॥
देवा तूचि गणेशु | सकलमति प्रकाशु |
म्हणे निवृत्तिदासु | अवधारिजो जी ॥२॥


ॐकार हाच परमात्मा आहे असे कल्पून, ज्ञानेश्वर महाराज येथे गणेशाला वंदन करतात. सर्वांच्या बुद्धीचा प्रकाश गणेश आहे. संपूर्ण वेद ही गणपतीची उत्तम सजविलेली मूर्ती आहे. तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभत असून, स्मृति हेच त्याचे अवयव आहेत. त्या स्मृतितील अर्थसौंदर्याने ते अवयव म्हणजे, लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. १८ पुराणे हेच त्याच्या अंगावरील रत्नखचित अलंकार असून, त्यात प्रतिपादलेली तत्त्वे हीच रत्ने व शब्दांची छंदोबद्ध रचना हीच त्याची कोंदणे आहेत. ही शब्दरचनाच त्याच्या अंगावरील रंगविलेले वस्त्र आहे आणि शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्रांचे चकचकीत तलम पोत आहे. काव्य, नाटके ही गणपतीच्या पायातील नाजूक घागर्या असून, त्या अर्थरूप ध्वनी रुणझुणत आहेत. त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्त्वे, त्यातील कुशलता यामध्ये उचित पदांची काही चांगली रत्ने आहेत. व्यासादिकांची बुद्धी म्हणजेच गणपतीच्या कमरेचा मेखला आहे. तिच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहेत. भारतीय दर्शनातील जी सहा शास्त्रे तेच गणपतीचे सहा हात असून, एकमेकांशी न मिळणारी मते हीच त्याच्या हातातील शस्त्रे आहेत. कणादशास्त्ररूपी हातांमध्ये अनुमानरूपी परशु आहे, गौतमीय न्यायदर्शनरूपी हातात प्रमाणप्रमेयादि षोडश पदार्थांचा तत्त्वभेदरूपी अंकुश आहे, व्यासकृत वेदांतसूत्ररूपी हातात, ब्रह्मरसाने भरलेला ब्रह्मज्ञानरूपी मोदक शोभत आहे, बौद्धमताचे निदर्शन करणार्या बौद्ध वार्तिकांनी प्रतिपादलेले बौद्धमत, हाच कोणी स्वभावतः खंडित असलेला पातंजलदर्शनरूपी दात एका हातात त्याने धरला आहे. बौद्धांच्या शून्यवादाचे खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कारवाद हाच गणपतींचा वर देणारा कमलासारखा हात असून, जैमिनीकृत धर्मसूत्रे हा धर्माची सिद्धी करणारा व अभय देणारा गणपतीचा हात आहे. सोलीव ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ, अतिनिर्मळ व बर्या-वाईटाची निवड करण्यास समर्थ अशी लांब सोंड आहे. तर संवाद हाच दात असून, त्यातील पक्षरहितपणा हा त्या दातांचा पांढरा रंग आहे. ज्ञानरूप बारीक डोळे असलेला, विघ्नांचा नियामक असा हा देव गणपती आहे. गणपतीचे दोन्ही कान म्हणजे पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा ही शास्त्रे असून, बोध हेच त्याचे मदरूपी अमृत, मुनिरूपी भ्रमर सेवन करतात. श्रुतीस्मृतींमध्ये प्रतिपादिलेली तत्त्वे, ही त्याच्या अंगावरील तेजदार पोवळी आहेत. तर द्वैत आणि अद्वैत ही त्याच्या मस्तकावरील गंडस्थळे असून, ती तुल्यबळाने तेथे एकत्र राहिली आहेत. ज्ञानरूप मध देण्यात उदार असलेली दशोपनिषदरूपी सुगंधी फुले, त्याच्या गंडस्थळावरील मुकुटावर शोभत आहेत. ॐकाराची प्रथम मात्रा ‘अकार’ हे गणपतीचे दोन पाय असून, दुसरी ‘उकार’ मात्रा हे त्याचे मोठे पोट आहे आणि तिसरी ‘मकार’ मात्रा हाच त्याच्या मोठ्या वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. या तिन्ही मात्रा एकवटल्या म्हणजे, त्यात संपूर्ण वेद सामावला जातो.

हे तिन्ही एकवटले | तेथ शब्दब्रह्म कवळले |
ते मिया गुरुकृपा नमिले | आदिबीज ॥


या ओव्यांमध्ये ज्ञानदेवांनी गणेशाला वंदन करून, त्याचे भव्यदिव्य रूप साकार केले आहे. संत ज्ञानेश्वरांना समकालीन असलेल्या संत नामदेवांनी, श्रीगणेशाचे फार सुंदर वर्णन केले आहे.

लंबोदरा तुज शोभे शुंडादंड | करीतसे खंड दुश्चिनांचा ॥


तुझ्या शुंडादंडाच्या ठिकाणी अवघ्या विघ्नांचा नाश करण्याचे सामर्थ्य आहे. बाळक्रिडेचे अभंग लिहिताना नामदेवांनी गणेशाला वंदन केले आहे. ते म्हणतात, "तुझे नाम घेतले असता दोष नाहीसे होतात. कळीकाळही तुझ्या नामप्रभावापुढे कापतात. तुझ्या कृपेने १४ विद्या प्राप्त होतील, तर मुकेही वेदघोष करतील. एवढे सामर्थ्य आहे.” असा त्यांनी श्री गणेशाचा गौरव केला आहे.

संत एकनाथांनी ‘एकनाथी भागवता’ मध्येही गणेशाला वंदन केले आहे. त्यावर ज्ञानेश्वरांचा प्रभाव आहे. एकनाथांनी ‘एकनाथी भागवता’च्या प्रत्येक अध्यायाची सुरुवात ‘अथ श्री गणेशाय नमः’ अशी केली आहे. पहिल्या अध्यायातील गणेशस्तवनाची सुरुवात ‘श्री गजाधिपतये नमः’ अशी करून, एकूण १५ ओव्या त्यासाठी गुंफल्या आहेत.

नमन श्री एकदंता | एकपणे तुचि आता |
एकी दाविसी अनेकता | परि एकात्मता न मोडे |


ज्ञानेश्वरांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि ज्ञानेश्वरीचा सखोल संस्कार या ओव्यांवर आहे. स्वसंवेद्य आत्मरूपाला वंदन केल्यावर ज्ञानेश्वरांनी ‘देवा तुचि गणेशु’ असे म्हणून, निर्गुणाच्या पातळीवरून सगुणाच्या पातळीवर गणेशास मानले आहे. एकनाथांनीही ‘एकी दाविसी अनेकता|’ असे म्हटले आहे. एकनाथांनी गणेशाच्या चार भुजा म्हणजे धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चार पुरुषार्थ असल्याचे मानले आहे. गणेशाचे दोन कान म्हणजे पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा ही कल्पना ज्ञानदेवांच्या गणेशरूपकातील आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाणी निःशब्द होऊन गणेशाला शरण जातात. एकनाथांचा गणेश सत्-रूप, चित्-रूप आणि आनंदरूप असा सच्चिदानंद रूप आहे. गणेशाचे चरण म्हणजे, प्रकृती आणि पुरुष आहेत. प्रकृतीपुरुष ही सांख्यतत्त्वज्ञानातील संकल्पना, एकनाथ महाराज येथे चरणयुगुलांसाठी योजितात. गणेशाच्या हाती परशु असून, त्याच्या आधारे श्रीगणेश ‘संसारफांसोटी’ म्हणजे संसारपाश तोडून टाकतो आणि भक्तांंना अभय देतो. निजबोधरूपी अंकुशाने भवव्यथा नष्ट करून, जन्ममरणाचे संकट नाहीसे करतो.

ऐशिया जी गणनाथा | मी पणे कैचा नमिता |
अकर्ताची जाहला कर्ता | ग्रंथ कथा विस्तारा ॥


असे सांगूनच एकनाथ निरूपणाला सुरुवात करतात. एकनाथी भागवताप्रमाणेच ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाचा आरंभही एकनाथांनी गणेशवंदनेनेच केला आहे.

ॐ नमो अनादि आद्या | वेद वेदांती वेद्या |
वंद्यही परमवंद्या | स्वसंवेद्या श्रीगणेशा ॥


असे स्तवन करूनच, गणेश माझ्या मुखात वसला आहे व श्रोता वक्ता तोच होऊन संतोष पावला आहे. भावार्थ रामायण वेगाने लिहून काढ अशी त्याने आज्ञा केली असल्याचे सांगून, एकनाथ ग्रंथलेखनाचे श्रेय गणेशालाच देतात.

ॐकार प्रधान रूप गणेशाचे | हे तिन्ही देवांचे ब्रह्मस्थान ॥
अकार तो ब्रह्मा | उकार तो विष्णू | मकार महेशू जाणियेला ॥


असे गणेशवंदन संत तुकाराम आपल्या अभंगात करतात आणि गणेशाचे स्वरूप स्पष्ट करतात.

मुस्लीम संतकवी शेख महम्मद यांचा विशेष उल्लेख या ठिकाणी करता येईल. त्यांनी त्यांच्या ‘योगसंग्राम’ ग्रंथात, श्रीगणेशास नमन करूनच ग्रंथलेखनास प्रारंभ केला आहे. आपल्या स्फूटरचनांमधून त्यांनी गणेशाचे आध्यात्मिकरूप वर्णिले आहे व त्याला वंदन केले आहे.

नमिला अविनाश गणेश | खाणीवाणीचा प्रकाश |
शास्त्रां न कळे ज्याचा अभ्यास | वोळखा हो असोनी नाही जाला ॥


शेख महम्मदांनी केलेले गणेशाचे वर्णन थोडे कूट स्वरूपाचे आहे. ‘असोनी नाही जाला’ म्हणजे, गणेशाच्या अनादित्वामुळे तो अखंड आहेच त्याला होणे नाही. त्याच्यामध्ये शिवशक्ती सामावल्या आहेत, असे ते म्हणतात. या पुढील गणेशाचे वर्णन ज्ञानेश्वरांनी वर्णिलेल्या गणेशवर्णनाप्रमाणेच आहे. ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक ग्रंथांवर गणेशाची मूर्ती बेतली आहे, तर शेख महम्मदांनी आध्यात्मिक संकल्पनांवर गणेशाची मूर्ती उभी केली आहे. उदा. कानांच्या ठिकाणी पंचप्राण, दया, क्षमा यांचे टाळ इत्यादि.

गणाधिश जो ईश सर्वा गुणांचा | मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा |


समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक लिहिताना प्रथम गणेशाला वंदन केले आहे आणि सगुण-निर्गुणाचा समन्वय साधला आहे. समर्थांनी वर्णिलेला गणेश सगुण आहे. म्हणूनच त्यांनी दासबोधात गणेशाचे रूप उलगडून दाखविलेले आहे.

भव्य रूप वितंड | भीममूर्ति माहाप्रचंड |
विस्तिर्ण मस्तकी उदंड | सिंधूर चर्चिला | नाना सुगंधे परिमळे | थबथबा गळती गंडस्थळे |
तेथे आली षट्पद कुळे | झुंकार शब्दे |
(जुना दासबोध १.२.१.-३०)


गणेशाला आळविताना ‘समर्थ’ म्हणतात. जेवढी म्हणून अज्ञानाची पुटे आपल्या मनावर बुद्धीवर साठलेली असतात, ती गणेशा तू झाडून टाकतोस. माणसाला भ्रांती झाली की, तो देह म्हणजेच मी असे समजायला लागतो. त्या अज्ञानाचा भ्रांतीछेद तू करतोस. म्हणून समर्थ रामदास गणेशाला ‘बोधरूपा’ असे म्हणतात. समर्थांनी रचलेली ‘सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची’ ही आरती, महाराष्ट्रात घरोघरी आळविली जाते. गणेशाच्या अलौकिक नृत्याचे वर्णनही, श्री समर्थ रामदासांनी केले आहे.

गणराज विराज विराजतसे | रुप साजन वाजन गाजतसे | रंग माजत माजत माजतसे | बहु नृत्य कळा हृदई विलसे ॥ धीदितां धिदितां धिंगितधा | ततथा ततथा तत थेगिंतथा | कुकुथारिकु थारिकुथारिकु था | नटनाट्य उलाट करी उलथा ॥

समर्थ रामदास रामभक्त होते तसेच गणेशभक्तही होते, असे त्यांनी वर्णिलेल्या गणेशरूपावरून म्हणता येते. श्रीराम समर्थ रामदासांचे आराध्य दैवत होते, तर हनुमंत हा त्यांचा आदर्श होता. मात्र, या दोघांनंतर समर्थांना गणेश या दैवताचीच विशेष ओढ होती. दासबोधाच्या अनेक दशकांच्या प्रारंभी, कधी अधेमध्येही गणेशाचे स्तवन त्यांनी केले आहे.

गणनाथा गणाधिशा | गणेशा गणनायका |
गणेंद्रा गंभीरा गुणा | गणपती गजानना ॥
रामोपासनेच्या परंपरेतील संत तुलसीदासांनी, आपल्या ‘रामचरितमानस’मध्ये श्रीगणेशाचा महिमा सांगितला आहे.
गाईये गणपति गणबंधन | संकर सुवन भवानी - नंदन ॥


असे प्रारंभी गणेशवंदन तुलसीदासांनी केले आहे. श्रीरामोपासक असूनही, गणेशाला अनेक ठिकाणी वंदन केले आहे.

गणेश वंदनाची ही संतपरंपरा अर्वाचीन काव्यात आलेली दिसते. श्रीदासगणू, श्रीगुलाबराव, श्रीवरदानंदभारती इत्यादी संतांनीही गणेशवंदन केलेले आहे. गाणपत्य संप्रदायांतील गणेशभक्त सत्पुरुषांनी आपले आयुष्यच गणेशोपासनेत व्यतित केले आहे. टिकेकरशास्त्री, इस्लामपूरकर वामनशास्त्री, गोसावीनंदन, मोरया गोसावी, श्रीगणेशयोगिंद्र इत्यादी सत्पुरुषांचा उल्लेख करता येईल.

ऋग्वेद काळापासून आजपर्यंत सर्व हिंदू संस्कृती ज्याने व्यापून टाकली, अशा या सिद्धिदाता, बुद्धिदाता गणेशाचे मनोहारी रूप सर्वच संतांनी आपल्या वाङ्मयात वर्णिलेले आहे.

डॉ. धनश्री साने
९८३३५७३९२७