‘ज्ञानी भक्त आनंदमठाचे’

    31-Aug-2025
Total Views |

नुकतेच डोंबिवलीचे साहित्यिक वामनराव देशपांडे यांचे निधन झाले. याच महिन्यात आजच्या दिवशी (जन्म ऑगस्ट-१९४४) ते ८१ वर्षे पूर्ण करून , ते ८२व्या वर्षात पदार्पण करणार होते. साहित्यक्षेत्रात पाच दशके त्यांचा वावर होता. त्यांचा मानसपुत्र या नात्याने माझे हे शब्दपुष्प...

कै. वामनराव व. देशपांडे साहित्यिक, निरूपणकार असे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होणे नाही हे वाक्य खरे तर शेवटी शोभते लिहिताना, तरी या हृदयीचे त्या हृदयी अर्पावे असे मनोमन वाटले. मी त्यांना ‘काका’ या नावाने संबोधित असलो, तरी तसा मी त्यांचा मानसपुत्रच होतो. डोंबिवलीत ते वास्तव्याला गिरगावातून आले.तेव्हापासून रोज भेटणे, दैनंदिन त्यांच्या व्याख्यानाला जाणे किंवा कवी संमेलनात जाणे-येणे होतच असे. गेली १२ वर्षे ते पूर्ण डोंबिवलीकरच झाले होते व ‘डोंबिवलीकर भूषण’ असे गौरविलेदेखील होते. याच नगरामध्ये साहित्यिकापेक्षा सर्वांचे प्रेमीमित्र झाले होते.

त्यांची ज्ञानी भक्तीची अफाट कृतिशील विनम्र साहित्यसेवा, उभ्या सृजन महाराष्ट्र मराठी वाचकवर्गाने पाहिली आहे. त्यांच्या हृदयीचे प्रेम संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथावर होते. मी गेली अनेक तपे (१२ वर्षे) ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथावर-अमृतानुभववर अनेक नित्य नवीन भाष्य ऐकत होतो. मंत्रमुग्धपणे अमृतसेवन केले, सर्व डोंबिवलीकर त्यास साक्षीदार आहेत. सहज सोप्या मराठी भाषेत प्रत्येक ओवीचा भाव विश्वाचा उलगडा ओघवत्या वाणीतून करताना असे वाटे की, शब्दअमृतांचा नायगरा धबधब्यात न्हाऊन निघत आहोत. त्यांचे घर म्हणजे जणू आनंदमठच. पत्ता आनंदमठ, अयोध्यानगरी (कुलूप नसलेले घर) डोंबिवली असेच होते. त्यांनी लिखाण स्वरूपात संतवाङ्मयाची सेवा प्रचंड केली. जवळ जवळ १२५ पुस्तके त्यांची प्रकाशित झाली आहेत. सन २००४ पासून प्रत्येक दि. ३१ ऑगस्टला, त्यांचा वाढदिवस घरी साधेपणाने साजरा होत असे. दिग्गजांचे फोन येणे, अनेक साहित्यिकांचे येणे-जाणे मी काकांकडे पाहिले, पण आमच्या काकांचे साधेपणे प्रेमभारले अगत्य पाहून थक्क होत असे. दुर्गा भागवत या त्यांच्या आवडत्या लोखिका, तसेच पाडगावकरांच्या सर्व कविता वाचून दाखवतही ते सर्वांना आनंदित करत. अनेक पुरस्कारांनी त्यांचे घर भरले होते. मला तर त्यांच्यामुळेच वाचनाचा छंद जडला. पण मला ते नेहमी सांगत की, मी (काका) पोषणवे तरलो ते फक्त संतवाङ्मयावरच. जोपर्यंत असे विपुल मराठी वाङ्मय या जगतात आहे, ‘ज्ञानेश्वरी’सारख्या ग्रंथाचे अनेकजण वाचन करत आहे, तोपर्यंत मराठी भाषा अक्षय राहील. ‘अमृतानुभव’वर भाष्य करावे, तर काकांनीच. ज्ञानदेवांच्या अनुभवाचे देवावाणीसारखेच मराठी भाषेत आपल्या गुरू श्री निवृत्तीनाथांना सांगणे मला काकांकडूनच लाभले. ४० वर्षे त्यंनी रिझर्व बँकेत सेवा दिली. काटेकोरपणा हाच बाणा त्यांच्या जीवनात असे. प्रेम हेच माझे चलन असल्याचे ते सर्वांना सांगत. माझे आराध्य दैवत श्रीराम असल्यामुळे ‘नामसाधना’ हे पुस्तक मला अर्पण केल्याने, मी धन्य झालो होतो. त्यांची साहित्यसेवा अफाट आहे. दिवाळी अंक ‘तरुण भारत’मध्ये प्रत्येक वर्षी लेखन होत असे. पहाटे ३ ते ५ वाजेपर्यंत लेखन होत असे. संत वाङ्मयलेखन हाच त्यांचा ध्यास होता व साहित्यावर भाष्य करणे सहजपणे ३ ते ४ तास होत असे.

जीवनात भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती असावी. माणसाने आग्रहपणे निष्काम निगर्वी असावे, असेच सांगणे मला होत असे व तसेच आचरण असावे. तत्त्वज्ञानाच्या साहाय्याने अक्षरब्रह्माची प्राप्ती करून घ्यावी, असेच ज्ञान ते वाटत. देशपांडे काका खर्या अर्थाने ज्ञानीभक्त होते.

आज असते, तर त्यांनी ८१ वर्षे पूर्ण करून ८२ वर्षांत पदार्पण केले असते. ईश्वराने पुन्हा पुन्हा असेच काका सर्वांना द्यावेत. अंतिम भेटण्यापूर्वी जवळ घेऊन मला विचारले होते की, "तुला मी काय पुस्तक रूपाने भेट देऊ?” कारण, माझाही वाढदिवस तीन दिवस अगोदर असे. मी भारावून म्हणालो, "काका, मला फक्त आपले आशीर्वाद हवेत. मला थोडे तरी लिहिते करा, असा आर्शिवाद द्या.” शेवटी व. पु. काळेंचे वपुंनी देशपांडे काकांना पूर्ण वाहिलेले ‘प्रेममयी’ हे पुस्तक भेट दिले. कै. वामनराव देशपांडे - व. पु. काळे अतुट मित्र होते. आज त्यांच्यामुळेच त्यांच्या जन्मदिनी, त्यांच्या आशीर्वादानेच अल्प शब्दफुलांची साहित्यफुले वाहिली.


सुधीर मोहिदेकर
९००४७६७६५२