अस्तित्वासाठी आत्मनिर्भर होणे आवश्यकच – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

30 Aug 2025 16:55:03

नवी दिल्ली, आजच्या दहशतवाद, महामारी आणि प्रादेशिक संघर्षांच्या युगात संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता हा पर्याय नसून अस्तित्व व प्रगतीसाठी अपरिहार्य अट आहे. हे संरक्षणवाद नाही; ही सार्वभौमत्वाची आणि राष्ट्रीय स्वायत्ततेची बाब आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ते नवी दिल्ली येथे ‘२१व्या शतकातील युद्ध’ या विषयावरील संरक्षण परिषदेत बोलत होते.

ऑपरेशन सिंदूर म्हणजे केवळ दिवसांचा लढा आणि पाकिस्तानच्या पराभवापुरती गोष्ट नव्हती; त्यामागे दीर्घकालीन योजना, रणनीती व स्वदेशी उपकरणांवर अवलंबून राहून केलेली तयारी होती. भारतीय सैन्याच्या दूरदृष्टीमुळे व कठोर परिश्रमामुळे हे मिशन निर्णायक ठरले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘सुदर्शन चक्र’ मिशनचा विशेष उल्लेख केला. आधुनिक युद्धात एअर डिफेन्सचे महत्त्व निर्णायक ठरत असल्याचे ते म्हणाले. २३ ऑगस्ट रोजी डीआरडीओने स्वदेशी एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीचे यशस्वी परीक्षण केले. एका वेळी तीन लक्ष्य भेदण्यात आले, जे या मिशनच्या दिशेने पहिले पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.

संरक्षणमंत्र्यांनी युद्धनौकांच्या स्वदेशीकरणाचा गौरव केला. आपले सर्व युद्धनौकांचे बांधकाम भारतातच होत असून अलीकडे जलावतरण झालेले आयएनएस हिमगिरी आणि आयएनएस उदयगिरी हे जागतिक दर्जाचे असून हिंद महासागर क्षेत्रात भारताची ताकद वाढवतील, असे ते म्हणाले. त्यांनी स्वदेशी एयरो-इंजिन प्रकल्पाची घोषणा करत हे क्षेत्र भारतासाठी मोठे आव्हान असून आता त्या दिशेने निर्णायक पावले उचलली जात असल्याचे सांगितले.

२०१४ मधील ७०० कोटी रुपयांच्या तुलनेत भारताचा संरक्षण निर्यात व्यवसाय २०२५ मध्ये तब्बल २४,००० कोटींवर पोहोचला आहे. भारत आज फक्त खरेदीदार नाही, तर विक्रेता बनला आहे. सार्वजनिक क्षेत्राबरोबरच खाजगी उद्योग, स्टार्ट-अप्स व उद्योजक यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले की, भारत कोणालाही शत्रू मानत नाही, पण राष्ट्रीय हितांशी तडजोड करणार नाही. जग जितका दबाव आणेल, भारत तितक्याच ताकदीने उभा राहील, असे ते ठामपणे म्हणाले. त्यांनी म्हटले की, संरक्षणातील आत्मनिर्भरता हा केवळ नारा नाही, तर भारताच्या सुरक्षितता, सार्वभौमत्व व प्रगतीचा रोडमॅप आहे.

‘सुदर्शन चक्र’ मिशनद्वारे पुढील दशकात देशातील महत्त्वाच्या ठिकाणांना संरक्षणात्मक व आक्रमक तंत्रज्ञान वापरून संपूर्ण हवाई सुरक्षा दिली जाणार आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले. यावेळी ते म्हणाले -


• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले ‘सुदर्शन चक्र’ मिशन भारताच्या हवाई सुरक्षेसाठी क्रांतिकारी पाऊल.

• पुढील दशकात देशातील महत्त्वाच्या ठिकाणांना पूर्ण हवाई संरक्षण कवच देण्याचे उद्दिष्ट.

• संरक्षणात्मक आणि आक्रमक दोन्ही तंत्रज्ञानांचा वापर करून हवाई हल्ल्यांना अचूक प्रत्युत्तर.

• २३ ऑगस्ट रोजी डीआरडीओचे यशस्वी परीक्षण – एका वेळी तीन लक्ष्यांचा अचूक भेद.

• मिशन पूर्ण झाल्यावर भारताकडे जगातील सर्वोत्तम एअर डिफेन्स सिस्टीम असेल.

• आधुनिक युद्धात भारताच्या सामरिक सुरक्षेचा कणा ठरणारे मिशन


Powered By Sangraha 9.0