एससीओ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी चीनला रवाना

30 Aug 2025 17:50:46

नवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी जपानचा दौरा संपवून चीनकडे रवाना झाले आहेत. तेथे तियांजिनमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे गलवान संघर्षानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे.

जपान दौरा “अत्यंत फलदायी” ठरल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले. “भारत-जपान सहकार्याची नवी दिशा या दौऱ्याने निश्चित केली आहे. त्यानंतर पंतप्रधान आता चीनला रवाना झाले असून ते एससीओ शिखर परिषदेतील महत्त्वपूर्ण चर्चांमध्ये सहभागी होतील,” असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केले.

या परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तसेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी यांची या दोन्ही नेत्यांसोबत स्वतंत्र द्विपक्षीय बैठकही होणार आहे. सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठका भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. विशेषतः अमेरिकेने नुकतेच भारतावर रशियन कच्चे तेल खरेदीसाठी २५ टक्के टॅरिफ लावले असून एकूणच ५० टक्के कर आकारणीचा परिणाम जागतिक व्यापारावर होत आहे. या पार्श्वभूमीवर चीन व रशियासोबत भारताचे संवाद आंतरराष्ट्रीय पटलावर महत्त्वाचे मानले जात आहेत.

एससीओमध्ये सध्या भारतासह बेलारूस, चीन, इराण, कझाकस्तान, किर्गिझस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान अशी १० देशे सदस्य आहेत. त्याशिवाय अनेक देश निरीक्षक आणि संवाद भागीदार म्हणून सहभागी आहेत. भारत २०१७ पासून एससीओचा सदस्य आहे. त्याआधी २००५ पासून तो निरीक्षक होता. सदस्यत्व मिळाल्यानंतर भारताने २०२० मध्ये ‘काउन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट’चे तसेच २०२२-२३ मध्ये ‘काउन्सिल ऑफ हेड्स ऑफ स्टेट’चे अध्यक्षपद भूषविले आहे.


Powered By Sangraha 9.0