सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या हस्ते 'भगवान बिरसा मुंडा भवन'चे लोकार्पण

30 Aug 2025 16:50:56

मुंबई : अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमच्या वतीने जननायक भगवान बिरसा मुंडा भवन (जनजाती अनुसंधान व प्रशिक्षण केंद्र) याचा लोकार्पण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. रविवार, ३१ ऑगस्ट रोजी सायं. ५:०० वाजता, मेट्रो एन्क्लेव रोड, सेक्टर–६, पुष्प विहार, नवी दिल्ली येथे सदर कार्यक्रम संपन्न होईल. हे भवन महान जनजाती स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या शुभहस्ते वास्तूचे लोकार्पण होईल.

बिरसा मुंडा हे भारतातील जनजाती समाजाच्या बलिदान, संघर्ष आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक होते. हे भवन संशोधन, प्रशिक्षण व सामाजिक कल्याण कार्यांचे प्रमुख केंद्र म्हणून कार्य करेल. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमची ही योजना अधिक महत्त्वाची ठरते कारण भारतात १५ नोव्हेंबर २०२४ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी केली जात आहे.

कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, केंद्रीय राज्य मंत्री दुर्गा दास उइके इत्यादी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील. पूज्य महामंडलेश्वर स्वामी यतींद्रानंद गिरी महाराज (जीवनदीप आश्रम – रुडकी) यांचे आशीर्वचन यावेळी उपस्थितांना लाभेल. अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे केंद्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंह कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील.

या लोकार्पण समारंभास विविध शासकीय व बिगरशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, दिल्ली व परिसरातील शिक्षणसंस्थांचे प्रमुख व उपप्रमुख, वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील समाजबंधू तसेच सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील. हे भवन जनजाती सशक्तीकरणाचे केंद्र बनेल. येथे जनजाती विषयांवरील संशोधन, युवकांसाठी नेतृत्व प्रशिक्षण तसेच परंपरा व ज्ञानपरंपरेच्या जतन–संवर्धनाशी निगडित उपक्रम राबवले जातील. या केंद्राची स्थापना भारतातील जनजाती समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे, तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रेरणादायी वारशाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे.


Powered By Sangraha 9.0