
जगात अनेक अद्भुत अभियांत्रिकी अविष्कार घडत असताना, सौदी अरेबियातील नियोम सिटीमध्ये २०२१ मध्ये ‘द लाईन’ हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प जाहीर करण्यात आला. या प्रकल्पाचा उद्देश मध्य पूर्वेतील शहरी विकासासाठी भविष्यकालीन दृष्टिकोन साकारणे आहे. जगातील सर्वांत मोठ्या प्रकल्पांपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या या प्रकल्पात एकमेकांना समांतर आणि सरळ रेषेत बांधलेल्या दोन गगनचुंबी इमारती असतील. वाळवंट आणि डोंगराळ प्रदेशात १७० किमीपेक्षा जास्त लांबीची ही रचना असेल. ही रचना म्हणजे, एक नवे शहर वसविणेच आहे. हे एक आधुनिक शहर असेल, ज्यामध्ये तीन स्तर आहेत, जिथे पृष्ठभागाचा स्तर हा निवासी जागा म्हणून वापरला जाईल, तर दोन भूमिगत स्तर वाहतूक आणि पायाभूत सुविधांसाठी वापरात येईल. हा एकरेषीय स्मार्ट सिटी मेगा प्रकल्प पूर्णपणे अक्षयऊर्जास्रोतांद्वारे चालवण्याचा प्रस्ताव आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिस आणि ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज (खेढ)’ यांसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाची श्रेणी असण्याची अपेक्षा आहे, जी शहराच्या पायाभूत सुविधांच्या प्रत्येक पैलूमध्ये एकत्रित केली जाईल.
‘द लाईन’ हे शहर नऊ दशलक्ष लोकांना सामावून घेईल आणि फक्त ३४ चौ. किमीच्या फूटप्रिंटवर बांधले जाईल. याचा अर्थ पायाभूत सुविधांचा वापर कमी होईल, ज्यामुळे शहरातील कामकाजात कधीही न पाहिलेली कार्यक्षमता निर्माण होईल. वर्षभर प्रत्येक हवामानात रहिवासी आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतील, याची खात्री होईल. हाय-स्पीड रेल्वे व्यतिरिक्त २० मिनिटांच्या ‘एण्ड-टू-एण्ड ट्रान्झिट’सह रहिवाशांना पाच मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर सर्व दैनंदिन जीवनावश्यक वस्तू उपलब्ध असतील.
नुकतेच या नव्याने बांधण्यात येत असणार्या शहराच्या बांधकामाचे फोटो समोर आले. नियोम येथील ‘द लाईन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जाईल्स पेंडलटन यांनी प्रकल्पाच्या विकासाबाबत नवीनतम अपडेट्स शेअर केले. ही टीम सध्या जगातील सर्वांत मोठ्या पायलिंग ऑपरेशनचे काम करत आहे. जागतिक स्तरावर काही सर्वांत मोठ्या पायलिंग रिंग तैनात करत आहे. ऑटोबर २०२४ पर्यंत केवळ पहिल्या टप्प्यात १६ हजारांहून अधिक पायलिंग रिंग बसवले जात आहेत, ज्यामध्ये २.५ मीटर व्यासाचे, ७० मीटर लांब आणि प्रत्येकी ८५० टन वजनाचे पायलिंगचा समावेश आहे. ‘द लाईन’चा आरसा असलेला दर्शनी भाग पूर्णपणे अक्षयऊर्जा प्रणाली आणि निसर्ग समावेशक असेल. याचा उद्देश पर्यावरणीय प्रभाव कमी करणे आणि राहणीमान वाढवणे आहे.
या प्रकल्पाचे बांधकाम २०२२च्या अखेरीस सुरू झाले. या प्रकल्पाचा पहिला पाच किमीचा भाग २०३० पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, २०४५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नियोमचे ‘द लाईन’ हे शहर जागतिक पुरवठा साखळी केंद्र म्हणून बांधले जात आहे, ज्यामध्ये प्रगत बांधकाम लॉजिस्टिकसाठी समर्पित ५० किमी विशेष झोन आहे. या जागेमध्ये एमईपी स्टोरेजसाठी क्षेत्रे, स्टील यार्ड, मॉडर्न मेथड्स ऑफ कन्स्ट्रशन (एमएमसी) यार्ड, कॉन्ट्रॅटर झोन आणि विशेष सुविधांचा समावेश आहे. या सुविधांमध्ये जनरल स्टोअर्स, डीवॉटरिंग लाईन आणि सी वॉटर फ्लशिंग सिस्टमसाठी एक क्षेत्र आहे, हे सर्व प्रकल्पाच्या मास्टर मॅपमध्ये काळजीपूर्वक नियोजित केले आहे.
पर्यावरणीय जबाबदारी पेलत या प्रकल्पात कमी कार्बन पदार्थ, एमएमसी पद्धती, समुद्राच्या पाण्याचा पुनर्वापर, पाणी बाहेर वाहून नेण्याची अद्ययावत टाकण्याची प्रणाली आणि ऑनसाईट उत्सर्जन कमी करण्यासाठी ऑप्टिमाईझ केलेली ऑफसाईट बांधकामपद्धती वापरली जाते आहे. सौदी अरेबियाच्या ‘व्हिजन २०३०’द्वारे समर्थित ‘द लाईन’ एका धाडसी संकल्पनेपासून एका मूर्त वास्तवाकडे हळूहळू संक्रमण करत आहे. एक आधुनिक शहर काय असू शकते, याच्या पारंपरिक कल्पनांना आव्हान देत, बांधकाम क्षेत्रात नवी परिमाणे आणि नव्या संकल्पना रुजवत आहे. ‘द लाईन’ हा प्रकल्प शाश्वत, ‘एआय’चालित शहरी विकासात आघाडी घेत स्वतःला जागतिक दर्जाचे स्थान देण्याची सौदी अरेबियाची महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित करतो.